Girls Hostel च्या बाथरूममध्ये आढळला छुपा कॅमेरा, विद्यार्थिनींचे आंदोलन; CCTV फुटेज लीक झाल्याची भीती

आंध्र प्रदेशातील एका इंजीनिअरिंग महाविद्यालयामधील मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये छुपा कॅमेरा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार तेथिल एका विद्यार्थिनीच्या लक्षात येताच तिने तातडीने वसतिगृह व्यवस्थापनाला याबाबत माहिती दिली. या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेले व्हिडीओ मुलांच्या वसतिगृहात शेअर करण्यात आलाचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी आंदोलन सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील आहे. येथील गुडलावलेरू कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये कॅमेरा असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. या घटनेमुळे विद्यार्थिनींमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये एकत्र येऊन निदर्शने सुरू केली आहेत. यावेळी त्यांनी We Want Justice च्या घोषणा दिल्या. वसतिगृहात कॅमेरे लावणाऱ्या आणि त्याचे फुटेज मुलांपर्यंत पोहोचवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला.या प्रकरणी पोलिसांनी एका शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. मात्र अद्यापही या विद्यार्थ्याची ओळख पटवून दिलेली नाही. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्यामुळे पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. चौकशी दरम्यान आम्ही अधिकाऱ्यांना सहकार्य करू, असे आश्वासन कॉलेज प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांना दिले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी कृष्णा जिल्ह्यातील गुडलावलेरू इंजीनिअरिंग महाविद्यालयातील छुप्या कॅमेऱ्याच्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.