
स व झ यांच्या उच्चारात अस्पष्टता असणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या तरुणाला सीआयएसएफ जवान निवड प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
वैभव यादव हा तरुण सीआयएसएफ जवान निवड प्रक्रियेत सहभागी झाला. या निवड प्रक्रियेतील चाचण्यांसाठी तो सक्षम आहे. मात्र उच्चारात स्पष्टता नसल्याचे कारण देत त्याला निवड प्रक्रियेतून बाद केले. तसे पत्र सीआयएसएफने दिले. त्याविरोधात त्याने न्यायालयाचे दार ठोठावले. न्या. रवींद्र घुगे व न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
उपचार घ्यावेत
वैभवने उच्चार सुधारण्यासाठी उपचार घ्यावेत. भविष्यात वैभवला पदोन्नती मिळणार असेल व त्याला सैन्याला कमांड द्यावी लागणार असल्यास सीआयएसएफने त्याची वैद्यकीय चाचणी घ्यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.
सीआयएसएफचे पत्र
लिस्प हा एक प्रकारचा बोलण्यात अडथळा आहे. सूक्ष्म लिस्पमुळे व्यक्ती प्रभावीपणे आदेश देऊ शकत नाही. म्हणून वैभवला निवड प्रक्रियेतून बाद केले जात आहे, असे पत्र सीआयएसएफने दिले होते.
वैभवचा युक्तिवाद
निवड प्रक्रियेत सहभागी झालेला उमेदवार न अडखळता बोलणारा असावा. बोलताना काही अंशी अडखळणारा उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो असा सीआयएसएफचा नियम आहे, असा युक्तिवाद वैभवकडून करण्यात आला. तो न्यायालयाने ग्राह्य धरला.























































