
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा वाद हायकोर्टात पोहोचला आहे. अंतिम मतदार यादीला एमसीएच्या जुन्या सदस्यांनी हायकोर्टात आव्हान दिले असून न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने तूर्तास पात्र उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेवर उद्या गुरुवारी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे.
एमसीएची निवडणूक लवकरच होणार असून या निवडणुकीसाठी 24 ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम उमेदवार यादीला एमसीएचे जुने सदस्य श्रीपाद हळबे व अन्य काही जणांनी आक्षेप घेतला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतीही कारणे न देता त्यांच्या हरकती फेटाळल्या व 24 ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर हरकती फेटाळल्या त्याची कारणे निवडणूक अधिकाऱ्यांनी द्यावीत. तसे आदेश न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या याचिकेवर न्यायमूर्ती रियाज छागला व न्यायमूर्ती फरहान दुभाष यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने कार्यकारिणी निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याबाबत कोणतीही घाई न करता परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याबाबतचा आदेश दिला तसेच 6 नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रमाबाबत विचार केला जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.




























































