
आरोपी सापडेल या आशेवर चौकशी सुरू ठेवण्याची परवानगी देता येणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सीबीआयचे कान उपटले. याचवेळी कोट्यवधी रुपयांच्या घोटाळय़ाप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा न्यायालयाने रद्द केला. या निर्णयामुळे केंद्रीय तपास यंत्रणेला मोठा झटका बसला आहे.
एका खासगी कंपनीच्या संचालक व अन्य अधिकाऱ्यांवर कोटय़वधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप सीबीआयने केला. या कंपनीच्या अज्ञात संचालक व अधिकाऱ्यांवर 2023 मध्ये सीबीआयने गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी कंपनीने याचिका दाखल केली.
मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या घोटाळ्याची चौकशी अजून सुरू आहे, असा दावा सीबीआयने केला. त्यावर न्यायालय संतप्त झाले.
या कंपनीने अनियमितता केल्याचा पुरावा अद्याप सीबीआयच्या हाती लागलेला नाही. या कंपनीच्या संचालकांविरोधात थेट आरोप नाहीत. या घोटाळ्यामुळे जनतेच्या पैशाचे नुकसान झाले, याचाही पुरावा सीबीआयकडे नाही, असे नमूद करत न्यायालयाने या कंपनी विरोधातील गुन्हा रद्द करत सीबीआयला चांगलीच चपराक दिली.
चौकशीचा फेरा अमान्य
फौजदारी प्रक्रियेचा वापर चौकशीचा फेरा सुरू ठेवण्यासाठी करता येणार नाही. ज्या प्रकरणात अद्याप एकही आरोपी सापडलेला नाही, अशा परिस्थितीत एक दिवस आरोपी सापडेल या आशेवर चौकशी सुरू ठेवण्याची परवानगी सीबीआयला देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.























































