तपोवन वृक्षतोड स्थगितच! लवादाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

नाशिक तपोवन येथील वादग्रस्त वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या स्थगितीमध्ये हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

कुंभमेळ्यासाठी तपोवन येथे साधुग्राम उभारण्यात येणार आहे. यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे. याविरोधात मधुकर जगताप यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. यावर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.  वृक्षतोडीच्या मुद्दय़ावर लवादासमोर सुनावणी सुरू असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. एकाच वेळी दोन्ही ठिकाणी सुनावणी होऊ शकत नाही. लवादाने दिलेल्या स्थगितीमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे लवाद की न्यायालयासमोर सुनावणी सुरू ठेवावी याचा निर्णय याचिकाकर्त्यांनी घ्यावा, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली.

नाशिक पालिकेला चपराक

लवादाने दिलेली स्थगिती रद्द करावी, अशी मागणी करणारा अर्ज नाशिक पालिकेने केला. या अर्जावर सुनावणी घेण्यासही नकार देत कोर्टाने चपराक दिली.