
कबीर कला मंचचे रमेश गायचोर यांना आजारी वडिलांना भेटण्यासाठी तात्पुरत्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश देऊनही त्यांना सोडण्यास दिरंगाई करणाऱ्या तळोजा कारागृह प्रशासनाला हायकोर्टाने फैलावर घेतल्यानंतर तुरुंग प्रशासन ताळय़ावर आले आहे. याप्रकरणी कारागृह अधीक्षकांनी आज माफीनामा सादर करत गायचोर यांची सुटका करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली.
भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषदप्रकरणी एनआयएने रमेश गायचोरला अटक केली होती. वडिलांच्या प्रकृतीचे कारण देत त्याने तात्पुरता जामीन मिळावा यासाठी हायकोर्टात त्यांनी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला होता. मात्र त्यांची सुटका न झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास येताच बुधवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने सरकारला फैलावर घेत तळोजा कारागृह प्रशासनाची चांगलीच कानउघडणी केल़ी न्यायालयाने याची दखल घेत 13 सप्टेंबरपर्यंत गायचोर यांचा जामीन मंजूर केला.