
आरोपीने चुकीची माहिती दिल्याने अन्य एकाला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीचा काहीच दोष नव्हता, अशी कबुली मुंब्रा पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली. यावर न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला.
आरिफ तयल असे या व्यक्तीचे नाव आहे. आरिफ तळोजा कारागृहात आहे. आरिफची बहीण आफरीनने त्याच्या सुटकेसाठी याचिका केली होती. न्या. सारंग कोतवाल व न्या. शाम चांडक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. आरिफविरोधात कोणताही पुरावा नाही, असे स्वतः पोलिसांनी सांगितले. तसा अहवाल सत्र न्यायालयात दिला. सत्र न्यायालयाने यावर कोणतेही आदेश दिले नाहीत. पण पोलीस विशेषाधिकारात त्याची सुटका करू शकत होते, असे न्यायालयाने मुंब्रा पोलिसांचे कान उपटले.
काय आहे प्रकरण…
जुलै महिन्यात आरिफला अटक झाली. अमली पदार्थ बाळगल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला. नंतर पोलिसांनी इरफान मुलतानी या आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्याच्या सांगण्यावरून आरिफला अटक केली, असा अहवाल पोलिसांनी सत्र न्यायालयात दिला. सत्र न्यायालयाने त्यावर काहीच आदेश दिले नाहीत. न्यायालयीन कोठडीचे आदेश नसताना आरिफला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करत त्याच्या बहिणीने न्यायालयाचे दार ठोठावले होते.