
निसर्गाचा अनमोल ठेवा आणि हिंदुस्थानचा संरक्षक कवच असलेला हिमालय सध्या भीषण संकटातून जात आहे. हिमालयातील हिमनद्यांना वितळण्याचा वेग प्रचंड वाढला आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटीग्रेटेड माऊंटन डेव्हलपमेंटने (आयसीआयएमडी) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, हिंदुकुश हिमालयीन प्रदेशातील बर्फ वितळण्याचा वेग 2000 सालापासून चक्क दुप्पट झाला आहे. हे केवळ पर्यावरणाचे नुकसान नाही, तर मानवासाठी विनाशाची नांदी ठरू शकते.
हिंदुकुश हिमालयाला पृथ्वीचा तिसरा ध्रुव म्हणून ओळखले जाते. हिमालयातील या हिमनद्या केवळ बर्फाचे डोंगर नाहीत, तर त्या हिंदुस्थान, पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशसह 8 देशांमधील 2 अब्ज लोकांची जीवनवाहिनी आहेत. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, यांगत्झी आणि मेकाँग यांसारख्या आशियातील 10 सर्वात मोठय़ा नद्या हिमालयातून उगम पावतात. जर हिमनद्या याच वेगाने वितळल्या, तर सुरुवातीला नद्यांना महापूर येतील आणि त्यानंतर या नद्या कायमच्या कोरडय़ा पडतील. ‘ग्लोबल वार्ंमग’ आणि हवामान बदलामुळे हिमालयाचे तापमान जागतिक सरासरीपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. परिणामी ‘तिसरा ध्रुव’ प्रदेश आता धोक्यात आला आहे.
लहान हिमनद्यांचे अस्तित्व संकटात
संशोधकांनी एका अत्यंत धक्कादायक बाबीकडे लक्ष वेधले आहे. ज्या हिमनद्यांचा आकार 0.5 चौरस किलोमीटरपेक्षा लहान आहे, त्या मोठय़ा हिमनद्यांच्या तुलनेत अधिक वेगाने आपुंचन पावत आहेत. या लहान हिमनद्या स्थानिक पाणीपुरवठय़ासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्या आकसल्याने डोंगराळ भागातील गावांमध्ये आतापासूनच पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे.


























































