बांगलादेशविरुद्धची मालिका रद्द करा! हिंदू महासभेची पंतप्रधानांकडे मागणी

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराचे पडसाद हिंदुस्थानात होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 6 ऑक्टोबरला हिंदुस्थान आणि बांगलादेश आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामना खेळविला जाणार असून बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारामुळे या सामन्याचा निषेध करत अखिल भारतीय हिंदू महासभेने ही मालिकाच रद्द करावी, अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहीले आहे.

ज्या बांगलादेशच्या भूमीवर हिंदूंवर अत्याचार झाले, त्या बांगलादेशी संघासोबत हिंदुस्थानी भूमीवर क्रिकेटचे सामने खपवून घेणार नाहीत, असा इशारा अखिल भारतीय हिंदू महासभेने दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी हिंदू महासभेने केली आहे. यासाठी हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या रक्ताद्वारे पत्र लिहीत पंतप्रधानांकडे मालिका रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे सामना शांततेत पार पाडणे आणि शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारात हिंदूंवर अत्याचार करून त्यांची कत्तल केली जात आहे. हिंदूंची घरे जाळली जात आहेत. अशा परिस्थितीत आपल्या देशाच्या क्रिकेट संघाचा सामना अशा भावना असलेल्या देशाच्या संघाशी होऊ नये. हिंदू महासभेने हा सामना रद्द करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. बांगलादेश संघाला देशाच्या भूमीवर खेळण्यापासून रोखले नाही तर ग्वाल्हेर येथे होणाऱ्या क्रिकेट सामन्याला हिंदू महासभा तीव्र विरोध करेल, असा इशाराही हिंदू महासभेने दिला आहे.