तेजस एमके-2 ला स्वदेशी इंजिन

देशाची सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने हिंदुस्थानने मोठी झेप घेतली आहे. हिंदुस्थानात आता अमेरिकन तंत्रज्ञानाने बनलेले लढाऊ विमानाचे इंजिन तयार होतील. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि अमेरिकेच्या जीई एअरोस्पेस यांच्यामध्ये तेजस एमके2 साठीचे इंजिन हिंदुस्थानात तयार करण्याचा करार झाला आहे. हा केवळ एक करार नाही, तर कोणत्याही विदेशी कंपन्यांवर अवलंबून न राहता स्वदेशी लढाऊ विमानांची निर्मिती करण्याच्या दिशेने हिंदुस्थानने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. 2035 पर्यंत एकूण 120 तेजस एमके2 ची निर्मिती स्वदेशात होणार आहे.

तेजस एमके-1 चे अत्याधुनिक व्हर्जन म्हणजे तेजस एमके- 2 या फायटर जेट आहे. विमानाचे इंजिन एकदम ताकदीचे आहे. शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता, लांब पल्ल्याची झेप, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हे लढाऊ विमान आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि अमेरिकेच्या जीई एअरोस्पेस यांच्यामधील करारानुसार, जीई कंपनी एफ414 नावाच्या इंजिनाचे तंत्रज्ञान हिंदुस्थानला देईल आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेट या इंजिनाची निर्मिती स्वदेशात करेल.

2035 पर्यंत एकूण 120 तेजस एमके2 ची निर्मिती

आपले लढाऊ जेट परदेशी कंपन्यांच्या इंजिनावर नव्हे तर स्वदेशी इंजिनावरच झेप घेतील. या कराराअंतर्गत 80 टक्के तांत्रिक माहिती अमेरिकी कंपनीकडून आपल्याला मिळेल. यासंबंधी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि अमेरिकेच्या जीई एअरोस्पेस यांच्यामधील करार प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या वर्षाअखेरपर्यंत ती पूर्ण होईल, अशी आशा आहे. त्यानंतर या विमानांना 2029 पर्यंत पूर्ण मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी तेजस एमके2 चे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होणार आहे. 2035 पर्यंत एकूण 120 तेजस एमके2 विमान बनवले जातील.