कोयना तिचे गाव… हिरकणी तिचे नाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आली तिसरी वाघीण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असणाऱया पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चंदा, तारा नंतर आता तिसरी वाघीण दाखल झाली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून पकडून आणलेल्या या वाघिणीस आज कोयना अभयारण्यातील घनदाट जंगलात मुक्त करण्यात आले. सह्याद्रुमीधील गाईड मंडळींनी या वाघिणीला ‘हिरकणी’ हे नाव दिले.

गुरुवारी सायंकाळी 5 वाजता पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून या वाघिणीला पकडण्यात आले होते. तिथून तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले. नंतर बोटीने प्रवास करून तिला शुक्रवारी रात्री सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना अभयारण्यात आणण्यात आले. तिथे पोहोचल्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी तिची तपासणी केली. तिला पाणी व मटण खाण्यासाठी घालण्यात आले.

कोयना अभयारण्यात वावरत असलेल्या बाजी या वाघाच्या जोडीला ही नवी वाघीण आल्यामुळे कोयना वन्यजीव अभयारण्यात पर्यटन वाढीसाठी ही घटना महत्त्वाची ठरणार आहे. कोयना अभयारण्यात आलेल्या या वाघिणीला पेंच व्याघ्र प्रकल्पात PTR 123 हा क्रमांक होता.

व्याघ्र प्रकल्पातील घडामोडींबद्दल औत्सुक्य

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर अशा तीन जिह्यात पसरलेला हा 1165 चौरस किलोमीटरचा हा परिसर जैवविविधतेने व अनेक दुर्मिळ प्रजातींनी समृद्ध असा आहे. या परिसरातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घडत असलेल्या या घडामोडी पर्यावरण प्रेमींसह सर्वांसाठीच औत्सुक्याचा विषय झाला आहे.