
प्रख्यात इतिहासकार, संशोधक, लेखक प्रा. डॉ. रामचंद्र श्रीराम मोरवंचीकर (88) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. फिजिशियन डॉ. विकास रत्नपारखे यांचे ते वडील होत.
पाणी हा इतिहासाचा केंद्रबिंदू मानून ज्यांनी अभ्यास केला. त्यात डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. प्रागैतिहासिक काळातील पुरावे शोधत पाणी हे इतिहास लेखनाचे साधन आहे. असे सांगत मोरवंचीकरांनी जलसंस्कृतीची मांडणी केली. त्यासाठी त्यांनी सातवाहन काळाचे मूलभूत संशोधन केले. अश्मक-मुलक, पेतानिक, मौर्यसत्ता आणि सातवाहन, त्यातील वेगवेगळे राजे यांचा अभ्यास असणारा त्यांचा ‘प्रतिष्ठान ते पैठण’ हा ग्रंथ त्यामुळेच महत्त्वपूर्ण मानला जातो. इतिहासाचे प्राध्यापक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी 40 वर्षे काम केले.
























































