
जवळपास 20 वर्षांच्या वाटाघाटींनंतर हिंदुस्थान आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करारावर आज शिक्कामोर्तब झाले. दिल्लीत सुरू असलेल्या हिंदुस्थान व युरोपीय महासंघाच्या शिखर परिषदेत ही घोषणा करण्यात आली. या करारामुळे हिंदुस्थानला व्यापारासाठी युरोपातील 27 देशांची बाजारपेठ खुली होणार आहे. अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान आणि युरोपीय देशांसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला ओन डेर लेन यांनी करारातील ठळक बाबींची माहिती दिली. त्यानुसार, पुढील सात वर्षांत युरोपियन युनियन हिंदुस्थानच्या 99.5 टक्के वस्तूंवरील टॅरिफ शून्यावर आणणार आहे, तर युरोपीयन युनियनलाही हिंदुस्थानची प्रचंड मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. युरोपीय युनियनच्या अनेक उत्पादनांवर हिंदुस्थानात असलेले 100 टक्क्यांहून अधिक टॅरिफ 10 ते 20 टक्क्यांपर्यंत खाली आणले जाणार आहे.
हिंदुस्थानातील या उद्योगांना बळ
चॉकलेट, सागरी उत्पादने, लेदर आणि टेक्सटाइल उत्पादने, केमिकल्स, रबर, हिरे आणि दागिने, धातू.
मदर ऑफ ऑल डील्स – नरेंद्र मोदी
हा करार जगातील दोन मोठय़ा अर्थव्यवस्थांमधील उत्तम भागीदारीचा नमुना आहे. हा करार जगाच्या 25 टक्के जीडीपीचे आणि एक तृतीयांश व्यापाराचे प्रतिनिधित्व करतो. लोक या कराराला ‘मदर ऑफ ऑल डील्स’ म्हणत आहेत. या करारामुळे दोन्हीकडील अब्जावधी लोकांसाठी नव्या संधी निर्माण होतील,’ असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
स्वस्त होणार…
हायफाय कार, औषधे, इलेक्ट्रॉनिक आणि अत्याधुनिक यंत्रे, स्टील, केमिकल उत्पादने.
अडथळ्य़ांचा प्रवास
हिंदुस्थान आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार कराराचा प्रवास हा अनेक अडथळय़ांचा ठरला. करारासाठी 2007 साली वाटाघाटी सुरू झाल्या होत्या. टॅरिफ, दर्जा आणि बाजारपेठेतील प्रवेशाच्या मुद्दय़ांवरून मतभेद झाल्यामुळे 2013 मध्ये बोलणी थांबली. जागतिक परिस्थितीतील बदलामुळे दोन्ही बाजूंना नव्याने चर्चेची गरज वाटल्याने 2022 साली पुन्हा चर्चा सुरू झाली. ती अखेर यशस्वी ठरली.
इंग्लिश दारू स्वस्त होणार
नव्या करारामुळे हिंदुस्थानात विदेशी दारू स्वस्त होणार आहे. युरोपातून आयात केल्या जाणाऱया वाईनवरील टॅरिफ 150 टक्क्यांवरून 75 आणि कालांतराने 20 टक्क्यांपर्यंत खाली आणले जाणार आहे. तर बिअरवरील टॅरिफ 50 टक्क्यांवर आणले जाणार आहे.
























































