होळी रे होळी

वर्षा फडके, [email protected]

होळी… आनंद… उत्साह… चैतन्य… रंगीबेरंगी नातं… आणि बरंच काही… आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र होळी आनंदात साजरी केली जाते, पण कोकणातील होळीचे वैशिष्टय़ काही औरच…!

विविधतेने नटलेल्या आपल्या देशात होळी हा सण विविध प्रकारे साजरा केला जातो. उत्तर हिंदुस्थान आणि उत्तर पश्चिम हिंदुस्थानात होळीचे रंग, होळीतले रंगढंग जास्त बोलबाला आहे. हिंदी चित्रपटातून तर होळी शृंगाराच्या अंगाने रंगविली आहे.

कोकणात मात्र होळी हा सण परंपरागत संस्कृतीने आणि प्रामाणिक श्रद्धेने कित्येक वर्षे उत्साहात साजरा केला जातो. सगळय़ा गावाला बांधून घेणाऱया या सणाची ओढ कोकणी माणसाला इतकी आहे की, कोकणातला चाकरमानी या सणाला आपल्या गावात जाण्यासाठी विलक्षण धडपड करतो. या दिवसांत कोकणात जाणाऱया गाडय़ा तुडुंब भरलेल्या असतात. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्हय़ात हा सण ज्या प्रचंड उत्साहाने साजरा होतो तितका तो लगतच्या सिंधुदुर्ग जिल्हय़ात होत नाही.

सिंधुदुर्गात प्रत्येक घरासमोर बेताची होळी पेटविली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. संध्याकाळी गावाच्या मुख्य मंदिरात गावकर जमा होतात. रितसर देवतांची पूजा करून सर्वांच्या साक्षीने होळी पेटविली जाते. होळीत अर्पण करण्यासाठी आणलेले नारळ होळीत टाकले जातात. होळीची पूजा करून होळीला प्रदक्षिणा घातल्यानंतर पुरणपोळीचा गोडधोड प्रसाद देवीला दाखविला जातो. पेटत्या होळीतले नारळ बाहेर काढून भक्तिभावाने प्रसाद म्हणून सगळेजण वाटून घेतात. होळी पेटविल्यावर मोठय़ा गमतीने एकमेकांना शिव्या घातल्या जातात व मग गळाभेट घेऊन हसत हसत घरी जातात. अशावेळी मोठय़ा आवाजात गावातील लोकांची नावे घेऊन अतिशय मजेमजेने तालासुरात कोटय़ा केल्या जातात-

आकाशातसून पडली सुरी।

आबल्याचीवाढली ढेरी।।

आकाशातसून पडला गिल्लास।

काळो बबनोखल्लास।।

किंवा

ढगातसून पडली बाटली।

खोतीण मानसांतसून उठली।।

असे काहीबाही, हलकेफुलके विनोदी नारे देत गावातली पोरे धांगडधिंगा घालतात. होळीच्या दिवशी किंवा दुसऱया दिवशी गावातले कलाकार ‘शिमग्याची सोंगे’ आणतात. अंगाला वेगवेगळे रंग फासून कोणी वाघ, मारुती, बैल, अस्वल अशी सोंगे आणून ‘शबय शबय’ करीत करमणुकीचा मोबदला घरोघर फिरून गोळा करतात. बहुरूपी इन्स्पेक्टर, ज्योतिषी बनून गमती निर्माण करतात. पुढे चाललेले शिमग्याचे सोंग आणि मागून चालणारे पोरांचे गलके हा एक खूप मजेशीर अनुभव गावाची करमणूक करतो.

गावातील माणसे, मने आणि परंपरा यांना जोडून ठेवणारा हा सण सर्वांना एकात्म आनंद देणारा असतो. या दिवसांत सगळा गाव, सगळे खाचखळगे दूर सारीत निर्मळ झऱयासारखा खळखळ वाहत असतो.

जावे आगीतून तेव्हा

       जाय कचरा जळून

       आणि उजळतो सारा

       जन्म सोन्याचा होऊन

       धरा, उचला पालखी

आनंदाचे भोई होऊ

जातीपाती, रंकराव

भेद विसरून जाऊ

       याचसाठी पेटविती

       होळी गावात, वेशीत

       इडापीडा जळो आणि

       गाव नांदू दे सुखात

शशिकांत तिरोडकर,[email protected]

आज गोड उद्या तिखट

होळीच्या दिवशी पुरणपोळीचे गोडधोड जेवण तर दुसऱया दिवशी ‘शीताचे’ म्हणजे धूलिवंदनादिवशी धुळवडीचे ‘तिखट’ जेवण दिले जाते. गावातील सर्व माहेरवाशिणींना सन्मानाने बोलावले जाते. तसेच गावातील सवाष्णींना व विधवा स्त्रीयांना ओटी भरण्याचा मान दिला जातो. गावातील मानकऱयांची उतरंड सांभाळतानाच गावातील सर्व लहानथोरांना या उत्सवात सामावून घेतले जाते.

सिंधुदुर्गात दोन दिवस जागवणारा हा सण रत्नागिरी जिल्हय़ातील बहुतांश भागात मात्र ‘फाग पंचमी’ म्हणजे फाल्गुन पंचमीपासून सुरू होतो व फाल्गुन अमावस्येपर्यंत चालतो. प्रत्येक गावातल्या प्रथापरंपरा लहानमोठय़ा फरकाने वेगवेगळय़ा आहेत. फाल्गुन पंचमीला होळीच्या ठरलेल्या ठिकाणी रिंगण करून ‘शेवरा’ या रान वनस्पतीची रोपे उभी करून, गवत घालून दररोज रात्री होळी करून जाळली जातात. वेगवेगळे मुखवटे घालून मुले फेर धरून नाचतात. कबड्डी, खो-खोसारखे खेळ गावागावांतून स्पर्धा आयोजित करून खेळले जातात. फाल्गुन पंचमीपासून पौर्णिमेपर्यंत म्हणजे तिथीप्रमाणे दहाव्या दिवशी मोठी होळी पेटविली जाते. होळीत दान करण्यासाठी घरटी प्रत्येक जण एक-एक लाकूड घेऊन येतो. एक खांब पुरून त्याच्या आधाराने ही लाकडे उभी रचली जातात. होळीच्या ठिकाणी पवित्र होम केला जातो. भक्तिभावाने पूजा करून पुरणपोळीचा ‘गोडा नैवेद्य’ दाखविला जातो..

आपल्याला रोज दिसणारे कलावंत, लेखक होळी कशी साजरी करतात पाहूया…

 घरच्यांबरोबर पुण्याला सेलिब्रेशन करणार…..प्राजक्ता माळी,अभिनेत्री

सध्या ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ ही मालिका झी मराठीवर सुरु आहे. या मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेली प्राजक्ता सध्या खुश आहे. प्राजक्ता सांगते की, यावर्षी होळीच्या दिवशी मला सुट्टी आहे. कोणतेही शूटिंग नसल्याने आणि कोणते कार्यक्रम घेतले नसल्याने मी यावेळी पुण्याला जाणार आहे. आमची पुण्यात जॉइंट फॅमिली आहे. काका-काकू शेजारीच राहतात. होळीच्या निमित्ताने मी जिथे राहते तिथे सहकारनगरमध्ये, तिथे सगळया घरातून सगळे एकत्र बाहेर पडतात आणि गल्लीभर बोंबा मारतात… तसे मी पण करणार आहे. खरे तर हे असे बोंबा मारण्याच्या निमित्ताने मला असे वाटते की, आपल्यातली नकारात्मकता आणि वाईट विचार बाहेर पडायला मदतच होते. होळी आणि पुरणपोळी असे एक समीकरण आहे. यावर्षी घरी जात असल्याने आईच्या हातच्या पुरणपोळयांवर ताव मारण्याचा बेत आहे. लहानपणी असताना रंगपंचमी खेळायचे पण आता रंगपंचमी खेळण्यापेक्षा पहायला आवडते.

होळी म्हणजे एकत्र येण्याचे निमित्त – बेला शेंडे, गायिका

आजकाल मुंबईमध्ये काय किंवा दुसऱया शहरात राहणारेसुध्दा घडय़ाळाच्या काटय़ावर आपले जीवन जगत असतात. सणवारानिमित्तानेच सगळे कुटुंब एकत्र येण्याला मदत होते. त्यामुळे होळी हा सण म्हणजे कुटुंबाला एकत्र येण्याचे निमित्त असे मी मानते. होळी आणि रंगपंचमी खेळताना या सणाचे पावित्र्य राखले जाणेही तितकेच महत्वाचे आहे. या होळीलासुध्दा मी आईने बनवलेली पुरणपोळी भरपूर खाणार आहे. कारण मला पुरणपोळी खूप आवडते. तसेही अधूनमधून घरी पुरणपोळी बनत असली तरी होळीच्या दिवशी पुरणपोळी खाणे यात वेगळीच मजा आहे. ती यावर्षी पण अनुभवणार आहे. अलिकडे नैसर्गिक घटकापासून तयार केलेल्या रंगांची जागा आता रासायनिक रंगांनी घेतली आहे. विविध प्रकारचे रंग पाण्यात मिसळून ते एकमेकांवर उडविले जातात. पण असे रंग आपल्याला हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे होळी खेळताना सावधानता पाळणे आवश्यक आहे. मी रंगपंचमी खेळत नाही, पण रंगपंचमी खेळणाऱयांना आवाहन करीन की त्यांनी सांभाळून रंग लावावेत.

होळी म्हणजे नकारात्मकता नाहीशी करण्याची संधी….फुलवा खामकर, नृत्यदिग्दर्शिका…

आला सण होळीचा… धमाल रंगपंचमी आणि पुरणपोळी अनुभवण्याचा असे आपण म्हणतो. मला स्वतःला असे म्हणाल तर होळी हा सण खूप आवडतो. होळीतले सगळे रंग मला खूप आवडतात. पूर्वी मी होळी खूप खेळायचे, पण आता होळी नाही खेळत. माझ्यासाठी होळी म्हणजे मनामधील नकारात्मकता, वाईट विचार, राग, लोभ, परस्परांवरील द्वेष, तिरस्कार दूर करण्याची एक संधी. ज्या वेळी आपण होळीला पुरणपोळीचा नेवैद्य दाखवतो आणि पाया पडतो तेव्हा आपल्याला आपले कलुषित झालेले मन स्वच्छ करण्याची संधी मिळते. आपल्यामधील नकारात्मकता दूर सारुन चांगले विचार आणि सकारात्मकता आणण्याचे काम हा सण करतो. होळी आणि पुरणपोळी असे एक समीकरण आहे. खरे तर मला पुरणपोळी खायला खूप आवडते, पण बनवता येत नाही. पण माझ्या मुलीला आणि नवऱयाला पुरणपोळी आवडत नसल्याने मी कधी घरी पुरणपोळी बनवली नाही. पण मला पुरणपोळी आवडत असल्याने मी मात्र पुरणपोळीवर बिनधास्त ताव मारणे पसंत करते.

पारंपारिकता अन् आधुनिकता याचा मिलाफ – मंजुश्री गोखले, लेखिका

रंगांची उधळण करणारा उत्सव म्हणजे होळी. निसर्गासमवेत मनातील रंगांचीही उधळण या दिवशी होते. त्यामुळे होळी हा सण पारंपारिकता आणि आधुनिकता यांचा मिलाफ साधत साजरा करण्यावर भर देणार आहे. खरे तर होळी, रंगपंचमी असे म्हटले की पुरणपोळी आलीच…पण हल्ली सगळेच डाएट कौन्शिअस असतात. मी मात्र घरीच उत्कृष्ट पुरणपोळी बनवते. मला तर पुरणपोळी खायलाही आवडते आणि खिलवायलाही आवडते. जुनं अर्पण करताना नवीन संकल्पना तयार करुन त्या स्वीकारणे याला पण महत्व आहे. होळी आली की होळी करताना झाडांची कत्तल होते. पण पर्यावरणाचा ऱहास थांबविण्यासाठी एक मेणबत्ती पेटवूनही होळी साजरी करता येऊ शकेल. मुळात वाईटाचा नाश करुन चांगल्याचे स्वागत करणे याला जास्त महत्व आहे. आजच्या टेक्नोसॅव्ही पिढीनेही जुने ते सगळे टाकाऊ असे समजू नये. होळी हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच या होळीत आपसामधील प्रेमाची नाती जोडून त्यात प्रीतीचे रंग भरुया…

 

 

आपली प्रतिक्रिया द्या