
लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीचा इथेनॉल केमिकल भरलेला टॅंकर जगबुडी नदीच्या पुलावर पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात आज दुपारी दीड वाजता झाला. टॅंकर पलटी झाल्यामुळे टँकरमधील इथेनॉल केमिकल गळती होऊन ते थेट जगबुडी नदीत मिसळल्याने पर्यावरण आणि पाणीपुरवठ्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे खेड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. खेड शहर व आजूबाजूच्या गावातील पाणी पुरवठा दुषित होण्याची भीती असल्याने खेड नगरपरिषदेने तातडीने पाणीपुरवठा बंद केला आहे. महाडहून लोटे एमआयडीसीकडे निघालेला हा टँकर पुलावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला. अपघातानंतर इथेनॉल केमिकल मोठ्या प्रमाणात सांडले आणि परिसरात तीव्र उग्र वास पसरला.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता खेड शहरासह वेरळ आणि इतर गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जगबुडी नदीवरील जॅकवेल विहिरींवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून खेड नगरपरिषदेने तातडीने पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल समाधानकारक आल्यानंतरच पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला जाणार आहे.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून लोटे एमआयडीसीमधील तज्ज्ञांची मदतही घेण्यात येत आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
हा इथेनॉल केमिकल टँकर महाड येथील लक्ष्मी इंडस्ट्रीजमधून बेंगळुरूकडे जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, या अपघातामुळे नदीचे पाणी दूषित होण्याची शक्यता व्यक्त होत असून स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. या घटनेमुळे केवळ अपघाताचेच नव्हे तर संभाव्य पर्यावरणीय संकटाचेही गंभीर स्वरूप समोर आले असून पुढील काही तास प्रशासनासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.



























































