
गणेशोत्सवासाठी मुंबई-ठाण्यातून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांपुढे प्रवासाचा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. नियमितसह जादा रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाल्याने पर्यायी वाहतुकीच्या शोधात असलेल्या भक्तमंडळींची मोठी पंचाईत झाली आहे. मुंबई-गोवा विमानाचे तिकीट तीन हजारांवरून थेट बारा हजारांवर गेले असून खासगी बसला तीन हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे गणपतीला गावी जायचे कसे, असा प्रश्न मुंबईकर-ठाणेकरांना सतावत आहे.
296 विशेष ट्रेनचे तिकीट पदरी न पडल्याने मुंबईकर-ठाणेकर मोठ्या चिंतेत सापडले आहेत. कोकण प्रवासासाठी पर्याय म्हणून असलेल्या मुंबई-गोवा विमानाचे तिकीट गगनाला भिडले आहे. हा विमान प्रवास करण्यासाठी तिकिटापोटी प्रति व्यक्ती दहा ते बारा हजार रुपये मोजावे लागणार आहेत. हीच अवस्था खासगी बसच्या बाबतीत आहेत. एरव्ही 1500-1600 रुपयांत गावी जाता येते, मात्र आता हेच तिकीट दुपटीहून अधिक वाढले आहे. खासगी बसवाल्यांचे तिकीट तीन हजारांच्या पुढे गेले आहे. कुटुंबीयांना सोबत घेऊन गावी जाण्याचे प्लॅनिंग करणाऱ्यांना विमान आणि बसचे तिकीट दर आवाक्याबाहेर गेले आहेत.
खड्डय़ांमुळे खासगी गाड्या मिळेनात!
मुंबई-गोवा महामार्ग अनेक ठिकाणी खड्डेमय बनला आहे. कित्येक ठिकाणी चौपदरीकरणाच्या अर्धवट कामामुळे चिखल साचला आहे. त्यामुळे गावचे भाडे घेण्यासाठी खासगी कारचे चालक तयार नाहीत.
ट्रॅव्हल्सवाल्यांकडून मनमानी लूट सुरू
मुंबई-ठाण्यातील हजारो कुटुंबांना अद्याप रेल्वेचे तिकीट मिळालेले नाही. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याची संधी साधत ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांची लूट करू लागले आहेत.