
उद्या, 14 ऑगस्टला मोठय़ा पडद्यावर दोन बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पहिला चित्रपट रजनीकांतचा ‘कुली’ तर दुसरा ऋतिक रोशनचा ‘वॉर-2’. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच वेळी धडक देणार आहेत. चित्रपटसृष्टीत येऊन रजनीकांत यांना 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा बहुचर्चित ‘कुली’ चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने ऋतिक रोशनने रजनीकांतसाठी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे. या पोस्टमध्ये रजनीकांत यांना 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटसृष्टीत मी पहिल्यांदा तुमच्यासोबत पाऊल ठेवले होते. अभिनयातील पहिल्या शिक्षकापैकी तुम्ही एक आहात. तुम्ही माझे आदर्श आहात. ऋतिकने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून 1986 साली प्रदर्शित झालेल्या ‘भगवान दादा’ या चित्रपटातून पदार्पण केले होते, तर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रजनीकांत होते.
‘कुली’चे एक तिकीट 4500 रुपयाला
रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाची तामीळ आणि तेलुगूमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चेन्नईत फर्स्ट डे फर्स्ट शोच्या एका तिकिटाची किंमत 4500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तिकीट ब्लॅकने विकले जात आहे. बंगळुरूमधील एका थिएटरमध्ये फर्स्ट डे, फर्स्ट शोचे 2 हजार रुपयांना तिकीट विकले गेले आहे. या ठिकाणी तिकिटाची किंमत केवळ 400 रुपये होती. रजनीकांतच्या ‘जेलर’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 96.59 कोटी रुपये कमावले होते, तर ‘कुली’ चित्रपट 100 कोटी रुपयांची कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.