
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातर्फे 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. बारावीला विज्ञान शाखेचा सर्वात जास्त 97.82 टक्के, त्यानंतर वाणिज्य 92.68 टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रम 83.26 टक्के, आयटीआय 82.3 टक्के, कला शाखेचा 80.52 टक्के निकाल लागला आहे. राज्यातील 147 निकाल राखीव ठेवण्यात आले असून यामध्ये पुणे 6, नागपूर 137, कोल्हापूर, अमरावती 1, लातूर 2 असे आहे. यंदा गैरप्रकार, कॉपी झालेल्या 124 केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. बारावीत शंभरपैकी शंभर गुण मिळवणारा एकही विद्यार्थी नाही. परंतु शंभर टक्के निकाल लागलेली अनेक महाविद्यालये आहेत. राज्यातील 1 हजार 929 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 90 ते 99.99 टक्के निकाल लागलेली महाविद्यालये 4 हजार 565 आहेत, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निकालाची वैशिष्टय़े
राज्यात दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.38 टक्के़
एकूण 154 विषयांपैकी 37 विषयांचा निकाल 100 टक्के.
जून महिन्यात पुरवणी परीक्षा, त्याचा निकाल 3 जुलैला लागणाऱ
बारावीची गुणपत्रिका 16 मे रोजी मिळणार.
गैरप्रकार 367.
राज्यातील147 निकाल राखीव.
कला, क्रीडा, विशेष सवलत गुण मिळालेले एकूण 20 हजार 943 विद्यार्थी.
90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी 8 हजार 352.
शून्य टक्के निकाल लागलेली महाविद्यालये 38.
टक्केवारीनुसार विद्यार्थी संख्या
90 टक्क्याहून अधिक 8 हजार 352 विद्यार्थी
85 ते 90 टक्के 22 हजार 317 विद्यार्थी
80 ते 85 टक्के 46 हजार 336 विद्यार्थी
75 ते 80 टक्के 74 हजार 172 विद्यार्थी
जेईई, नीटसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळण्याच्या दृष्टीने यंदा परीक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आली. परीक्षेच्या काळात कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी राज्यभरात करण्यात आली. त्यात विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. शिवाय यंदा राज्य मंडळाने स्वतः पेपर गोळा करण्यासाठी यंत्रणा विकसित केली.- शरद गोसावी, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष
प्रथमश्रेणी, विशेष प्राविण्यात मात्र घसरण; पदवी प्रवेशासाठी चुरस
मुंबईचा बारावीचा एकूण निकाल वाढला असला तरी प्रथम श्रेणी, विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱयांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत बऱयापैकी कमी झाली आहे. परिणामी पदवी प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या (एचएससी) विद्यार्थ्यांमध्ये आणि सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच चुरस राहील.
यंदा मुंबईतून बारावीची परीक्षा दिलेल्या 3,14,144 विद्यार्थ्यांपैकी 2,91,955 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण 14.55 टक्के इतके आहे. तर गेल्या वर्षी हे प्रमाण 15.62 टक्के इतके होते. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावी परीक्षार्थींची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे विशेष प्रावीण्य मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या 45,972 पेक्षा यंदा कमी म्हणजे 42,481 इतकी आहे.
हीच घसरण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱयांमध्येही पाहायला मिळते. गेल्या वर्षी उत्तीर्ण झालेल्यांपैकी 29.59 टक्के विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली होती. यंदा हे प्रमाण 28.98 टक्क्यांवर आले आहे.
श्रेणीनिहाय निकाल
विशेष प्राविण्यासह (75 टक्के आणि पुढे) – 42,481
प्रथम श्रेणी (60 टक्के आणि पुढे) – 84,632
द्वितीय श्रेणी (45 टक्के आणि पुढे) – 1,26,539
उत्तीर्ण श्रेणी (35 टक्के आणि पुढे) – 38,303