
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 24 जून ते 16 जुलै या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 24 जून ते 8 जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास पुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने 5 मे रोजी बारावीचा, तर 13 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. या परीक्षांतील अनुत्तीर्ण, एटीकेटी प्राप्त विद्यार्थी, श्रेणी सुधार करू इच्छिणारे विद्यार्थी यांना संधी मिळण्यासाठी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.