जगज्जेत्या क्रिकेटपटूंची ‘ब्रॅण्ड पॉवर’ वाढली, जेमिमा रॉड्रिग्जचे मानधन 100 टक्क्यांनी वाढले

जगज्जेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर नाव कोरून इतिहास घडविणाऱ्या हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघातील खेळाडूंच्या ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’त मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. रविवारी नवी मुंबईत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजय मिळवीत हिंदुस्थानी महिलांनी प्रथमच महिला वन डे वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकाविले. या यशानंतर महिला क्रिकेटसमोर नवीन संधींचा दरवाजा खुला झाला असून, खेळाडूंच्या जाहिरात करारांच्या मानधनात तब्बल 25 ते 100 टक्के अशी घसघशीत वाढ झाल्याचे समजते.

स्मृती मानधनाचे सर्वाधिक मानधन

स्मृती मानधना सध्या तब्बल 16 ब्रॅण्ड्सची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे. तिचे प्रत्येक ब्रॅण्डमधून 1.5 ते 2 कोटी रुपये इतके मानधन असल्याचे समजते. ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या मॅनेजिंग डायरेक्टर प्रिया नायर यांनी सांगितले की, ‘कर्ल्ड कप जिंकण्यापूर्कीच ‘सर्फ एक्सेल’च्या ‘दाग अच्छे हैं’ अभियानासाठी आणि ‘रेक्सोना’च्या जाहिरातीसाठी योजना तयार करण्यात आली होती. ‘प्रत्येक मैदान त्या स्त्रीचं आहे, जी तिथे उभी राहते, निर्भयपणे खेळते आणि आपलं सर्वस्व पणाला लावते,’ असा जाहिरातीत संदेश होता.’

फॉलोअर्स वाढले; चौकशांचा पूर

एका वृत्तपत्रााच्या अहवालानुसार, जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, शेफाली कर्मा यांच्यासह अनेक खेळाडूंच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची संख्या दुपटीने वाढली आहे. त्याचबरोबर ‘ब्रॅण्ड एंडोर्समेंट’साठी चौकश्याही झपाट्याने वाढल्या आहेत. बेसलाइन व्हेंचर्सचे व्यवस्थापकीय संचालक तुहिन मिश्रा म्हणाले, ‘आज सकाळपासूनच ब्रॅण्ड चौकश्यांचा पूर आला आहे. नव्या करारांसोबतच जुन्या करारांचे पुनर्मूल्यांकनही सुरू झाले असून, फीमध्ये 25 ते 30 टक्क्यांनी वाढ केली जात आहे.’ जगज्जेतेपदाला गवसणी घातलेल्या हिंदुस्थानी महिला क्रिकेटपटूंना योग्य सन्मान आणि ओळख मिळाली आहे. मात्र, या गौरवाला दीर्घकाळ टिकवून ठेवणे हेच आता त्यांच्यापुढील खरे आव्हान असेल.

जेमिमाचा ब्रँड व्हॅल्यू वधारला

127 धावांच्या खेळीनंतर तिच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूत तब्बल 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स’चे चीफ कमर्शियल ऑफिसर करण यादव यांनी सांगितले, ‘ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना संपताच आमच्याकडे 10-12 वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सकडून प्रस्ताव आल्याचे त्यांनी सांगितले.