‘मिनी महाबळेश्वर’ मध्ये खड्ड्यांचे पर्यटन, रस्त्यांची चाळण; डागडुजीचे लाखो रुपये गेले कुठे ?

‘मिनी महाबळेश्वर’ असा जव्हारचा उल्लेख केला जातो. येथील थंडगार हवा.. धबधबा.. हिल स्टेशन याचा अनुभव घेण्यासाठी असंख्य पर्यटक येथे येतात. मात्र या पर्यटकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत असून रस्त्यांची चाळण झाली आहे. डागडुजीसाठी आलेले लाखो रुपये गेले कुठे, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. सरकारने जव्हारमधील पर्यटनस्थळांना ‘ब’ दर्जा दिला असला तरी कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे या ‘मिनी महाबळेश्वर’ मध्ये खड्ड्यांच्या पर्यटनासाठी आम्ही यायचे काय, असा सवाल करण्यात येत आहे.

जव्हार हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. येथील हनुमान पॉइंट, जय विलास पॅलेस, जुना राजवाडा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. पावसाळ्यात तर येथील निसर्गाला बहर येतो. मात्र अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने पर्यटकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. या खड्ड्यांचा स्थानिकांनादेखील मोठा त्रास सहन करावा लागत
आहे. शहरातील मुख्य रस्ते, बस स्थानक परिसर, बाजारपेठ, शाळा-कॉलेजच्या रस्त्यांवर पाइपलाइन टाकण्यासाठी मोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे हे खड्डे केवळ डागडुजीच्या प्रतीक्षेत नाहीत तर अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित अवस्थेत आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष
रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पर्यटकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यालगत पोलीस निरीक्षक निवासस्थान, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तहसीलदारांच्या निवासस्थान, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांचे निवासस्थान आहे.

पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथील जनतेला रोजचा प्रवास त्रासदायक बनला आहे.
स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.