
अफगाणिस्तानचा सहज पराभव करत सुपर एटमध्ये आघाडीवर असलेल्या हिंदुस्थानी संघाला बांगलादेशचा पराभव करून थेट उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. पहिल्या गटात ऑस्ट्रेलियासह हिंदुस्थाननेही विजयी सलामी दिल्यामुळे दोन्ही संघ आघाडीवर आहेत आणि उद्या बांगलादेशवर मात करताच हिंदुस्थानचा उपांत्य फेरी प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जाईल.
बांगलादेशला ऑस्ट्रेलियाने सहज हरवल्यामुळे पहिल्या गटातील अफगाणिस्तान आणि बांगलादेश उपांत्य फेरीच्या शर्यतीत मागे पडले आहेत. याचा थेट फायदा हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाला मिळणार आहे. तसेही बांगलादेशविरुद्ध हिंदुस्थानचा संघ वर्ल्ड कपमध्ये एकही सामना हरलेला नाही. हीच मालिका नॉर्थ साऊंडलाही कायम राहिली तर हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे उपांत्य प्रवेश आपोआप निश्चित होतील आणि बांगलादेश-अफगाणिस्तान हे दोघेही स्पर्धेबाहेर फेकले जातील.
काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांगलादेशचा संघ फलंदाजीसह गोलंदाजीतही कमी पडला होता. फक्त कर्णधार नजमल शांतो आणि तौहीद हृदॉय यांनी आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. उर्वरित त्यांचे सारेच फलंदाज ढेपाळले होते. तसेही बांगलादेशच्या एकाही फलंदाजात सातत्य नसल्याचा फायदा हिंदुस्थानी गोलंदाजांना घेता येईल. नार्थ साऊंडची खेळपट्टी टी-20 क्रिकेटला पोषक असल्यामुळे 200 धावांचा टप्पा सहज गाठला जाऊ शकतो. परंतु हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली असल्यामुळे टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे. पण या खेळपट्टीवर षटकार-चौकारांची आतषबाजी होणार हे निश्चित आहे.
फलंदाजांच्या फॉर्मची काळजी
हिंदुस्थानच्या रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, शिवम दुबे यांना आपल्या बॅटची कमाल दाखवता आलेले नाही. विराट कोहलीला सलग चार सामन्यांत सलामीची धुरा दिली होती, पण त्याला आपला आयपीएलचा फॉर्म अद्याप दाखवता आलेला नाही. त्याच्या निराशाजनक फलंदाजीमुळे त्याला पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर पाठवायचे की सलामीचा प्रयोग सुरूच ठेवायचा, या द्विधा मनस्थितीत संघ व्यवस्थापन अडकले आहे. उद्याही विराटला सलामीचीच संधी दिली जाऊ शकते आणि यातही तो आपली फलंदाजी दाखवू शकला नाही तर शेवटच्या सुपर एट साखळी सामन्यात विराटला सलामीला पाठवण्याचे धाडस संघ व्यवस्थापन दाखवणे कठीण असेल. सध्या तरी हिंदुस्थानच्या फलंदाजीला सूर्यकुमार यादवचा आधार आहे. त्याच्या फलंदाजीमुळे हिंदुस्थान रडतखडत का असेना आपल्या अपेक्षित लक्ष्यापर्यंत पोहोचतोय.
बुमरा है ना…
सध्या हिंदुस्थानी संघाचा तारणहार जसप्रीत बुमराच आहे. हिंदुस्थानी फलंदाजांच्या अपयशामुळे कमी धावसंख्येतही तो हिंदुस्थानला यश मिळवून देतोय. जवळजवळ सारेच फलंदाज त्याच्या गोलंदाजीसमोर चाचपडत खेळत असल्यामुळे उद्या बांगलादेशी फलंदाजांचीही तीच परिस्थिती होणार, यात शंका नाही. उद्याही हिंदुस्थानी संघात कोणताही बदल होण्याची कमी शक्यता असल्यामुळे अक्षर पटेलसह कुलदीप यादवची फिरकीही दिसेल. हीच फिरकी हिंदुस्थानसाठी निर्णायक ठरणार आहे.