
हिंदुस्थानने आजपासून (04 फेब्रुवारी 2026) आपल्या टी20 वर्ल्डकपच्या अभियानाला सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा सराव सामना खेळला जात आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये कोणते खेळाडू खेळणार आणि कोणाचा पत्ता अव्वल अकरामधून कट होणार, याचं चित्र आजच्या सराव सामन्यात जवळपास निश्चित होणार असल्याच मानलं जात आहे. याच पार्श्वभुमीवर संजू सॅमसनची अव्वल अकरामधून विकेट पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात सलामीला अभिषेक शर्मासोबत कोण उतरणार? हे पाहाण्यासाठी चाहते उत्सुक होते. संजू सॅमसन मैदानात उतरेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, अभिषेक सोबत मैदानात आला इशान किशन. इशान किशन फक्त मैदानात आलाच नाही, तर त्याने बहरदार फलंदाजीही केली. 50 हून अधिक धावा करत त्याने मैदान सोडलं. इशानच्या नंतर वनडाऊनला संजू येईल असं वाटणार तोच तिलक वर्मा मैदानात उतरला. त्यामुळे आता टी20 वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसनला तंबुत बसूनच सामना पाहावा लागण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. याला कारणीभूत ठरलीय संजू सॅमसनची खराब कामगिरी.
संजू सॅमसनसाठी न्यूझीलंडविरुद्ध पार पडलेली पाच सामन्यांची टी-20 मालिका निराशाजनक ठरली. त्याला पाचही सामन्यांमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र, त्याला संधीचं सोनं करता आलं नाही. त्याने पाच सामन्यांमध्ये फक्त 46 धावा केल्या. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला. दुसरीकडे इशान किशनने धुरळा उडवून दिला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खोऱ्याने धावा चोपून काढल्या आहेत. चार डावांमध्ये त्याने 213 च्या भन्नाट स्ट्राईक रेटने 215 धावा केल्या आहेत. यामध्ये एक अर्धशतक आणि एका खणखणीत शतकाचा समावेश आहे.




























































