असोसिएट संघांचा धमाका; नेपाळ, नेदरलॅण्ड्स, अमेरिकेने जिंकली मने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटमध्ये बलाढ्य संघ व लिंबू-टिंबू संघ यांच्यातील लढत मांजर-उंदराच्या खेळासारखी वाटायची. मोठे संघ छोटय़ा संघांना तुडव तुडव तुडवायचे. मात्र, यंदाच्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये लिंबू-टिंबू समजल्या जाणाऱ्या असोसिएट संघांनी ही संकल्पनाच इतिहासजमा केल्यासारखे वाटतेय. कारण या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सुरुवातीलाच नेपाळने इंग्लंडला शेवटच्या ओव्हरपर्यंत झुलवले. नेदरलँडने पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवले, तर अमेरिकेने थेट यजमान टीम इंडिया आणि पाकिस्तान या जगज्जेत्या संघांनाच कडवे आव्हान देण्याचा पराक्रम केला. या असोसिएट संघांना विजयाने हुलकावणी दिली असली तरी, त्यांनी क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.

अमेरिका आता ‘जायंट किलर’

अमेरिका अर्थात यूएस हा आता केवळ सहभागी संघ नाही, तर धडकी भरवणारा प्रतिस्पर्धी ठरतोय. 2024 मध्ये पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये हरवणाऱया अमेरिकेने यावेळी ‘टीम इंडियाला’ही अडचणीत टाकले. पॉवरप्लेमध्येच 4 विकेट्स उडवत अमेरिकेने हिंदुस्थानची आघाडीची फळी कापून काढली होती. शॅडली व्हॅन शाल्कविकच्या 4 बळींनी हिंदुस्थानच्या फलंदाजीला भगदाड पाडले होते. मात्र, सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकामुळेच हिंदुस्थान 160 पार जाऊ शकला. अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानने 190 धावसंख्या उभारली म्हणून ते वाचले. नाहीतर लक्ष्याचा पाठलाग करताना ‘जायंट किलर’ अमेरिकेने जोरदार प्रतिकार करीत 158 धावा केल्या.

नेपाळने इंग्लंडची जिरवली

असोसिएट संघांनी जगज्जेत्या संघांचा घामटा काढून ‘आम्हाला लिंबू-टिंबू समजण्याची चूक करू नका’, असा इशारा दिलाय. कधीकाळी नेट प्रॅक्टिस समजल्या जाणाऱया असोसिएट संघांनी आता मातब्बर संघांच्या छातीत धडकी भरवली आहे. 2022 मधील जगज्जेता इंग्लंड संघ नेपाळसमोर अक्षरशः घामाघूम झाला. करोडोंमध्ये कमावणाऱया इंग्लिश खेळाडूंविरुद्ध अवघ्या 3,500 रुपयांत खेळणाऱया नेपाळी खेळाडूंनी सामना अखेरच्या ओव्हरपर्यंत नेला. इंग्लंडला वानखेडेवर 200चा आकडा गाठता आला नाही. नेपाळच्या फिरकीपटूंनी इंग्लंडच्या मधल्या फळीला गुडघे टेकायला लावले. या लढतीत हरता हरता जिंकलेल्या इंग्लंडची नेपाळने चांगलीच जिरवली, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती.