ऑस्ट्रेलियाच्या अलाना किंगने पाकिस्तानला रडवलं; अर्धशतक झळकावत इतिहास रचला, अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू

ICC Women’s World Cup 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या अलाना किंगने पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हिंदुस्थानी वंशाच्या या फिरकीपटूने गोलंदाजीने नव्हे तर आपल्या फलंदाजीने पाकिस्तानची झोप उडवली आणि खणखणीत अर्धशतक झळकावलं आहे. महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 51 धावांची ऐतिहासिक खेळी करणाली अलाना किंग आता पहिली खेळाडू ठरली आहे.

कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. 115 धावांवर 8 विकेट अशी दयनीय अवस्था संघाची झाली होती. यानंतर फलंदाजीला येत अलाना किंगने बेथ मूनीच्या सोबतीने संघाचा डाव सावरला आणि संघाला 200 पारही नेलं. दोघींनी मिळून नवव्या विकेटसाठी 106 धावांची ऐतिहासिक भागी केली. यापूर्वी महिला वनडे क्रिकेटमध्ये नवव्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागी कोणालाच करता आलेली नाही. तर अलाना किंगने दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 3 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 9 गड्यांच्या मोबदल्यात 221 धावा केल्या आणि पाकिस्तानला जिंकण्यासाठी 222 धावांचे आव्हान दिले.