
खेलो इंडिया हिवाळी खेळ 2026 करीता निवडण्यात आलेल्या खेळाडूंची निवड बर्फाऐवजी खडबडीत शहाबादी फरशीवर चाचणी घेऊन केल्याप्रकरणी हायकोर्टाने सरकारच्या क्रीडा विभागवर ताशेरे ओढले आहेत. खेळाडूंची निवड प्रक्रिया अत्यंत धक्कादायक असल्याचे निरीक्षण नोंदवत खेळाडूंच्या निवडलेल्या संघाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र क्रीडा विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लेह लडाख येथे होणाऱया ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी हॉकी संघ निवडण्याची जबाबदारी क्रीडा संचालनालयावर होती. पुण्यात आईस हॉकीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची आईस रिंक उपलब्ध असतानाही क्रीडा आयुक्तांनी एका स्केटिंग क्लबच्या खडबडीत फरशीवर ही चाचणी घेतली हॉकी संघाच्या निवडीमध्ये झालेल्या गंभीर अनियमिततेबाबत हायकोर्टात ऍड. शुभम सोनावणे,
ऍड. विनोद सांगवीकर, ऍड. सिद्धेश्वर गलांडे यांच्या मार्फत याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेत राज्याच्या क्रीडा विभागाच्या कारभारावर बोट ठेवले. पुण्याच्या वाकड येथील फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये आईस हॉकीसाठी योग्य सुविधा उपलब्ध असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून एका सामान्य स्केटिंगच्या ठिकाणी निवड चाचणी घेण्यात आली. या प्रक्रियेत ज्यांच्यावर एफआयआर दाखल आहेत अशा व्यक्तींचा सहभाग नोंदवण्यात आला. इतकेच काय तर आईस हॉकी हा खेळ बर्फावरील कौशल्याचा आहे जो फरशीवर तपासला जाऊ शकत नाही, असे सुनावत हायकोर्टाने 19 खेळाडूंच्या निवडीला स्थगिती दिली व या प्रकरणाची सुनावणी 18 फेब्रुवारी रोजी निश्चित केली.
























































