बर्फ महागल्याने हजारो मच्छीमार गारठले, मासेमारीला समुद्रात उतरण्याआधीच महागाईचे चटके; पहिल्याच हंगामात 80 रुपयांची दरवाढ केल्याने संताप

पावसाळ्यातील बंदीकाळानंतर आज दर्याचा राजा ताज्या फडफडीत मासळीसाठी खोल समुद्रात झेपावला आहे. मात्र पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांनी बर्फाच्या दरात टनामागे 80 रुपयांची वाढ करून मच्छीमारांना वेठीस धरले आहे. विश्वासात न घेता अचानक मासेमारी सुरू होण्याच्या पहिल्याच दिवसापासून बर्फाच्या दरात वाढ केल्याने मच्छीमारांना प्रत्येक फेरीसाठी वाढीव हजार ते बाराशे रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे मुंबई, रायगड जिल्ह्यातील जवळपास 1200 हून अधिक बोटींना याचा फटका बसणार असून मच्छीमारांचे बजेट गारठणार आहे.

पावसाळी मासेमारी बंदीचा 61 दिवसांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर आजपासून मासेमारी हंगामाला सुरुवात झाली आहे. यामुळे करंजा, ससून डॉक, मोरा, कसारा आणि इतर अनेक बंदरातून दररोज मासेमारीसाठी सुमारे 1000 ते 1200 मच्छीमार बोटी मासेमारीसाठी रवाना झाल्या आहेत.

खोल समुद्रातील मासेमारी करण्यासाठी 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. या दरम्यान पकडलेली मासळी ताजीतवानी, सुरक्षित ठेवण्यासाठी बर्फाची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. मुंबई, नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रातून मच्छीमारांना मागणीप्रमाणे बर्फाचा पुरवठा केला जातो.

मासेमारी बोटीला एका ट्रीपसाठी साधारणतः 10 ते 12 टन बर्फाची गरज भासते. मात्र मागील वर्षी 2200 रुपये प्रतिटन दराने मिळणाऱ्या बर्फाच्या दरात व्यापाऱ्यांनी यावर्षी टनामागे 80 रुपयांची वाढ केली आहे.

डिझेल कोटाही उशिरा दिला मच्छीमारांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न
घेता व्यापाऱ्यांनी अचानक बर्फाच्या दरात वाढ केल्याने 2300 रुपये दराने बर्फाची खरेदी करावी लागत आहे. दरवाढ करून मच्छीमारांना वेठीस धरण्याच्या या प्रकारामुळे आर्थिक नुकसान होत असल्याने मच्छीमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यातच मच्छीमारांना शासनाकडून मिळणारा डिझेल कोटाही शेवटच्या क्षणी उशिराने मंजूर झाला असल्याने मासेमारीसाठी पहिल्याच दिवशी विलंब झाला असल्याची माहिती पर्ससीन नेट फिशिंग असोसिएशनचे संचालक व्यावसायिक रमेश नाखवा यांनी दिली.