
निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महसूल विभागात काही दिवसांपूर्वी अर्थपूर्ण होलसेल बदल्या झाल्या. पण त्याची तातडीने अंमलबजावणीही झाली. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग, कृषी, शालेय शिक्षण व क्रीडा, वित्त, सार्वजनिक बांधकाम अशा विविध विभागांतील सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखक अशा सुमारे तीनशे जणांच्या बदल्यांचे आदेश मे महिन्यात जारी झाले. पण या आदेशाच्या अंमलबजावणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 30 मे 2024 रोजी 148 लिपिक टंकलेखांच्या आणि 159 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले, पण बदल्यांच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यानंतर जून महिन्यात गृह विभागात अंतर्गत बदल्या झाल्या, पण त्यातील काहींनी नवीन जबाबदारी स्वीकारलेली नाही. गृह विभागात अकरा अवर सचिवांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. वास्तविक ‘एक व्यक्ती एक पद’ असे सूत्र आहे. पण सरकारी यंत्रणेत अनेक अधिकारी दोन ठिकाणचा कार्यभार सांभाळत आहेत.
अवर सचिवांच्या विरोधात उपोषण
गृह विभागातून अंतर्गत बदलीचे आदेश निघालेल्या दोन अवर सचिवांपैकी एका अवर सचिवाच्या विरोधात तर उपोषण करण्याचा इशारा नगरमधील एका तथाकथित भ्रष्टाचार निर्मूलन समितीने दिला आहे. या समितीने तर थेट राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. या दोघांना तत्काळ कार्यमुक्त न केल्यास 16 ऑगस्टपासून मंत्रालयासमोर आमरण उपोषण पुकारण्याचा इशारा या समितीने दिला आहे. अवर सचिवांच्या विरोधात उपोषण पुकारण्याची ही पहिलीच घटना आहे.