बेकायदा बांधकामांनी दिवा गिळला; निवडणुकीच्या धामधुमीचा फायदा घेत बांधले टॉवर

बेकायदा बांधकामांनी दिवा अक्षरशः गिळला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत अधिकारी आणि संपूर्ण यंत्रणा व्यस्त असल्याचा फायदा घेत भूमाफियांनी दिव्यात टोलेजंग टॉवर्स बांधले आहेत. न्यायालयाने तोडण्याचे आदेश दिले असतानादेखील सध्याच्या घडीला १० इमारतींचे काम जोरात सुरू आहे. दरम्यान, बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या पालिकेच्या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅड. रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा बांधकामांचा प्रश्न चिघळत आहे. कळवा, मुंब्रा आणि दिवा हा परिसर बेकायदा बांधकामांचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. यासंदर्भात अनेक वेळा आवाज उठवूनदेखील ही बांधकामे थांबण्याचे नाव काही घेत नाहीत. निवडणूक काळात व त्याआधीही दिवा परिसरात अनेक बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत. अनेक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात मुंडे यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देत दिवा विभागातील सर्व बेकायदा बांधकामांवर तातडीने कारवाई सुरू करण्याची मागणी केली आहे.

निवडणूक धामधुमीच्या काळात भूमाफियांकडून सर्रासपणे इमारती उभ्या केल्या जातात. दिवसाढवळ्या मजले चढवले गेले आहेत. बेकायदा बांधकामांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असून पाणी, ड्रेनेज, रस्ते, अग्निशमन यंत्रणा व इतर नागरी सुविधांवर ताण पडत आहे.

… तर न्यायालयात याचिका
गेली अनेक वर्षे मी दिवा विभागातील बेकायदा बांधकामांविरोधात सातत्याने लढा देत आहे. तत्कालीन महापालिका आयुक्तांना तब्बल ११० अनधिकृत इमारतींचा छायाचित्रांसह अल्बम सादर केला होता तरीसुद्धा आजतागायत त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे. जर येत्या काही दिवसांत ठोस कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा शिवसेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी दिला आहे.