
ग्रामीण भागात लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याने तरुणाई वेगळ्याच संकटात सापडली आहे. अकोल्यातील मंगेश या तरुणाने थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच पत्र दिले आहे. ‘माझं वय वाढत चाललंय, पण मुलगीच मिळत नाही. घरजावई व्हायलाही तयार आहे, पण मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या!’ अशी मागणीच त्याने केली आहे.
पवारांना लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, ‘‘माझे वय वाढत चालले आहे. भविष्यात माझे लग्न होणार नाही, अशी भीती वाटते. मी एकाकीपणामुळे त्रस्त झालो आहे. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायला तयार आहे. तिथे काम करून संसार नीट चालवीन, याची मी हमी देतो. कृपया माझ्या जीवनाचा विचार करून मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्यावी. मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही!’’ मंगेश हा बीए असून आता एमए करत आहे, तो स्विगीचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.
राष्ट्रवादी मदत करणार
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे म्हणाले, या तरुणाला मदत करण्याचे आदेश आम्हाला वरिष्ठांनी दिले आहेत. लवकरच आम्ही त्याच्यासाठी योग्य वधू संशोधन सुरू करणार आहोत. त्याचे आयुष्य सेटल करण्याची जबाबदारी पक्ष घेईल.
























































