
किल्ले विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावा, यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मुसळधार पावसाची पर्वा न करता रविवारी सकाळी विशाळगडाच्या पायथ्याला महाआरती करण्यात आली. विशाळगड अतिक्रमणावरून न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी जलदगतीने व्हावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे म्हणाले, किल्ल्यावर सुमारे 156 अनधिकृत अतिक्रमणे आहेत. यामध्ये तीन मजली मशीद आहे. तसेच मलिक रेहान दर्ग्याचे अतिक्रमणसुद्धा आहे. पुरातत्व खात्याचे कडक नियम पाहाता, ही अतिक्रमणे झालीच कशी? ही सगळी अतिक्रमणे त्वरित पाडली जावीत, अशी सकल हिंदू समाजाच्या वतीने सरकारकडे मागणी करण्यात आली. तर सरकारने गड-किल्ले संवर्धनास समितीला दिलेल्या 800 कोटी रुपयांच्या निधीतून काय कामे झाली, याचा हिशेब द्यावा आणि त्या समितीकडून सर्वच गडांवरील अतिक्रमणांचा पाठपुरावा करावा, अशी मागणी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी केली.
यावेळी बांदल घराण्यातील अनिकेत बांदल, हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे, महेश विभुते, मानसिंग कदम, विशाल पाटील, आकाश पवार, ओंकार कारंडे, रुपेश वारंगे, तुषार पाटील आदी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.