
कल्याण-शिळ रस्त्यावर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूककोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी तातडीने नियोजन करून योग्य उपाययोजना कराव्यात यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आवाज उठवला होता. शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला वाहतूककोंडी सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतूककोंडीबाबत उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी आवाज उठवला होता. याबाबत त्यांनी नगरविकास मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला होता. या पत्रात त्यांनी वाहतूककोंडीची समस्या मांडली होती. राहुल भगत यांच्या निवेदनाची दखल घेऊन नगरविकासच्या कक्ष अधिकारी नेहा आंगणे यांनी कोकण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी कल्याण-शिळ मार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्याबाबत स्पष्ट अभिप्राय व शिफारशींसह आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या उपाययोजना करा
वाहतूककोंडी कमी करण्यासाठी नगरविकास मंत्रालयाने कल्याण-शिळ रस्त्याची प्रत्यक्ष पडताळणी करून नवीन पर्यायी मार्ग आखण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी राहुल भगत यांनी केली आहे. तसेच काटई-ऐरोली उन्नत मार्ग आणि केडीएमसीचा रिंग रूट प्रकल्प युद्धपातळीवर कार्यान्वित करावा असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.






























































