महत्त्वाच्या बातम्या – सुमेध वडावाला लिखित ‘कार्यकर्ता’ला पुरस्कार 

पुणे मराठी ग्रंथालयातर्फे उत्कृष्ट साहित्यकृतीस देण्यात येणारा पै. ना. ह. आपटे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सुमेध वडावाला (रिसबूड) लिखित उन्मेष प्रकाशनाच्या ‘कार्यकर्ता’ या आत्मकथेला जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळकांच्या जन्मगावी चिखलगाव या दुर्गम गावात शाळा स्थापन करून परिसराच्या सर्वांगीण ग्रामविकासासाठी 45 वर्षे झटणाऱ्या डॉ. राजा दांडेकर यांचा आव्हानात्मक प्रवास आत्मकथेत प्रभावीपणे मांडला आहे. पुणे येथे 25 नोव्हेंबरला सुमेध वडावाला यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आतापर्यंत त्यांची कथासंग्रह, कादंबरी आणि आत्मकथा या प्रकारांतील 37 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यापूर्वी त्यांना स्नेहांजली, साहित्यश्री, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्ःमय पुरस्कार असे 19 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

पोलीस पुत्राची आत्महत्या  

पंचवटीतील हिरावाडी येथे 24 वर्षीय पोलीस पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ऋषिकेश कौतिक कांदळकर असे त्याचे नाव आहे. तो जानेवारीत होणाऱ्या सीए परीक्षेची तयारी करत होता. शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घरी एकटाच असताना त्याने गळफास घेतला. काका शंकर कांदळकर यांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. त्याचे वडील ग्रामीण पोलीस दलात दिंडोरी येथे कार्यरत आहेत. एकुलता एक असलेल्या ऋषिकेशने असे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. मात्र, त्याच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकलेले नाही.