जगभरातून महत्वाच्या बातम्या

एनविडीयाने मायक्रोसॉफ्टला मागे टाकले, ऍपल कंपनी तिसऱया स्थानावर

एआय चिप बनवणारी अमेरिकन कंपनी ‘एनविडीया’ ही जगातील सर्वाधिक मौल्यवान कंपनी बनली आहे. ‘एनविडीया’ने मायक्रोसॉफ्टला मागे टाकून हे स्थान मिळवले. मंगळवारी एनविडीया कंपनीच्या शेअर्समध्ये 3.5 टक्के वाढ होऊन कंपनीचे मार्केट कॅप 3.34 ट्रिलियन डॉलर एवढे झाले. त्याच वेळी मायक्रोसॉफ्टच्या शेअरमध्ये 0.5 टक्के आणि ऍपलच्या शेअरमध्ये 1.1 टक्के घसरण झाली. ‘एनविडीया’च्या खालोखाल मायक्रोसॉफ्ट 3.32 ट्रिलियन डॉलरसह जगातील दुसरी मौल्यवान कंपनी ठरली. तर ऍपल 3.27 ट्रिलियन डॉलरसह तिसऱया क्रमांकावर आहे.

कुवैत अग्निकांडातील पीडितांच्या कुटुंबियांना 12.5 लाखांची भरपाई

कुवैत सरकार दक्षिण अहमदी प्रांतातील मंगफ भागात लागलेल्या अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 15 हजार अमेरिकी डॉलर (12.5 लाख रुपये) नुकसान भरपाई देणार आहे. या आगीत 50 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. यात 46 जण हिंदुस्थानी नागरिक होते.

टॅक्सवाढीविरोधात केनियात जनक्षोभ

केनियात सरकारने वाढवलेल्या टॅक्स विरोधात लोक रस्त्यांवर उतरले. सरकारविरोधात आंदोलन करणाऱया 200 हून अधिक लोकांना पोलिसांनी अटक केली. राजधानी नैरोबीत आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात रस्त्यांवर उतरून घोषणा दिल्या. अनेकांनी टिकटॉक आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या टॅक्सवाढीचा विरोध केला आहे.

पॉपस्टार जस्टिन टिम्बरलेकला अटक

10 ग्रॅमी अवॉर्ड विजेता पॉप स्टार गायक जस्टिन टिम्बरलेक याला पोलिसांनी अटक केली. दारू पिऊन गाडी चालवल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जस्टिनला थांबवून ब्रेथलायझर टेस्ट देण्यास सांगितले. परंतु जस्टिनने टेस्ट देण्यास नकार दिला. जस्टिन हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता.