देशभरातील महत्वाच्या घडामोडी

केदारनाथमध्ये पर्यटक बचाव मोहीम

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने 8 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण जखमी झाले आहेत. केदारनाथ येथे अडकलेल्या 250 पर्यटकांना एसडीआरएफच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढणे सुरू केले आहे. आतापर्यंत 133 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एमआय-17 आणि चिनूक या अत्याधुनिक हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. रुद्रपयाग जिल्हा प्रशासनाने पर्यटकांसाठी अधिसूचना जारी केली आहे.

6 डिसेंबरला प्रदर्शित होणार ‘पुष्पा-2’

‘पुष्पा-2 द रूल’ हा चित्रपट येत्या 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आधी
ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार असे बोलले जात होते. चित्रपट निर्मात्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. परंतु आता हा चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

10 सप्टेंबरला आयफोन 16 सीरिज लाँच होणार

आयफोन 16 सीरिजच्या लाँचिंगवरून आयफोन चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. या पोनच्या लाँचिंगवरून एक मोठी अपडेट समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार आयफोन 16 सीरिज 10 सप्टेंबरला लाँच होण्याची शक्यता आहे. परंतु अॅपल कंपनीने लाँचिंगची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. आयफोन 16 सीरिजच्या फोनमध्ये कंपनी एक अॅक्शन बटन देणार आहे. प्रो मॉडल्समध्ये अल्ट्रावाईड लेन्सला अपग्रेड करू शकते. फोनची किंमत, फिचर्स लाँचिंगवेळी उघड होईल.

अमरनाथ यात्रा एक दिवसासाठी स्थगित

जम्मू-कश्मीरमधील कलम-370 आणि 35 अ हटवले, याला सोमवारी पाच वर्षे झाली. जम्मू- कश्मीरमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. अमरनाथ यात्रा एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली. या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवली जात आहे. बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी निघणारी पवित्र अमरनाथ यात्रा 29 जूनपासून सुरू झाली असून ती 19 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

गौतम अदानी 70 व्या वर्षी निवृत्त होणार

64 वर्षांचे अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी 70 व्या वर्षी निवृत्त होण्याची घोषणा केली. 2030 साली अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अध्यक्षपद दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवणार आहेत. गौतम अदानी यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत ही घोषणा केली. गौतम अदानी यांचा मोठा मुलगा करण अदानी सध्या अदानी पोर्टस्चा व्यवस्थापकीय संचालक आहे, तर छोटा मुलगा जीत अदानी अदानी एअरपोर्टस्चा संचालक म्हणून कार्यभार पाहत आहे.

पुण्याच्या सिद्धांतचा मृतदेह अखेर सापडला

पुण्यातील सिद्धांत पाटील या तरुणाचा मृतदेह अखेर 28 दिवसांनंतर अमेरिकेतील नॅशनल पार्कात सापडला. मोंटानामधील ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये बुडाल्याने सिद्धांतचा मृत्यू झाला होता. गेल्या 28 दिवसांपासून सिद्धांतचा शोध सुरू होता. सिद्धांत कॅलिफोर्नियात वास्तव्यास होता. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सिद्धांतचा मृतदेह मिळाल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. 6 जुलैपासून त्याचा शोध सुरू होता.

आयपॅड युजर्सना केंद्र सरकारचा अलर्ट

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी केंद्र सरकारने आयटी सेलला अलर्ट जारी केला आहे. यासोबत पोन युजर्सनेही अलर्ट राहावे, असे सांगत केंद्र सरकारने आयफोन्स, आयपॅड्स आणि अॅपल युजर्संसाठीसुद्धा अलर्ट जारी केला आहे. स्पॅम कॉल, मेसेज किंवा पोन स्पूफिंगद्वारे आवश्यक माहिती आणि डेटा लीक केला जाऊ शकतो. आयफोन युजर्सने अलर्ट राहावे, असे केंद्र सरकारने आपल्या अलर्टमध्ये म्हटले आहे.