
‘आय लव्ह यू’ म्हणणे ही भावनांची अभिव्यक्ती आहे, गुन्हा नाही. कुणी केवळ ‘आय लव्ह यू’ म्हटले, तर त्यातून लैंगिक हेतू सिद्ध होत नाही, असे महत्वपूर्ण निरिक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. 2015 मध्ये किशोरवयीन मुलीची छेड काढल्याच्या आरोपाखाली 35 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. त्या तरुणाने तक्रारदार मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हटले होते. मात्र त्यावरुन तक्रारदार मुलीशी लैंगिक संबंध ठेवण्याचा हेतू सिद्ध होत नसल्याचे नमूद करीत न्यायालयाने आरोपी तरुणाची निर्दोष मुक्तता केली.
न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या एकलपीठाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. कोणत्याही लैंगिक कृत्यामध्ये अनुचित स्पर्श, जबरदस्तीने कपडे उतरवणे, अश्लील हावभाव किंवा महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने केलेली टिप्पणी यांचा समावेश आहे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
आरोपी तरुणाने नागपूर येथील 17 वर्षीय मुलीचा हात धरला होता आणि तिला उद्देशून ‘आय लव्ह यू’ असे म्हटले होते. याप्रकरणी नागपूरच्या सत्र न्यायालयाने 2017 मध्ये आरोपी तरुणाला भारतीय दंड संहिता तसेच पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली दोषी ठरवले होते आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने ती शिक्षा रद्द केली. मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हणण्यामागे तरुणाचा खरा हेतू त्या मुलीशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा होता हे दर्शविणारी कोणतीही परिस्थिती दिसून येत नव्हती. आरोपीने लैंगिक हेतूने मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा कोणताही पुरावा नाही, असेही निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आणि आरोपी तरुणाला दिलासा दिला.