
स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यानंतर संगीतकार आणि गायक पलाश मुच्छल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता त्याच्यावर फसवणुकीचे गंभीर आरोप झाले आहेत. याप्रकरणी राज्यातील सांगली जिल्ह्यात पलाश मुच्छल विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या तक्रारीत त्याने एका व्यक्तीची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
ही तक्रार अभिनेता आणि निर्माता विज्ञान माने यांनी दाखल केली आहे. विज्ञान माने हा स्मृतीचा बालपणीचा मित्र असून तो एक फिल्म फायनान्सर म्हणुन कार्यरत आहे. स्मृतीच्या वडिलांनी पलाशची ओळख विज्ञान सोबत करुन दिली होती. या ओळखीच्या आधारे पलाशने विज्ञानला ‘नजरिया’ या चित्रपटात गुंतवणूक करण्यास सांगितले. पलाशनं सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर गुंतवलेली रक्कम पुन्हा मिळेल, असे आश्वासन दिले होते. पलाशने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून विज्ञानने 40 लाख रूपये गुंतवले. मात्र, संबंधित चित्रपटाचे काम अर्धवट राहिले. ते वेळेत पूर्ण झाले नाही.
विज्ञानने पलाशला आपली गुंतवलेली रक्कम पुन्हा मागितली. मात्र, पलाशने रक्कम देण्यास टाळले. तसेच विज्ञानला त्याने सतत असमाधानकारक उत्तरे दिली. काही दिवसानंतर पलाशने विज्ञानचे फोन उचलणेही टाळले. यानंतर विज्ञानने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्याने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.


























































