
राज्यात गेल्या काही वर्षांत अमली पदार्थांचे सेवन आणि विक्रीत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याचे गृह विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. राज्यात ऍण्टी नार्कोटिक्स सेल स्थापन करण्यात आला आहे. पण तरीही ड्रग्ज विक्रीला आळा घालण्यात अपयश येत आहे. या वर्षीच्या मे महिन्यात केलेल्या तीस दिवसांच्या विशेष कारवाईत 140 कोटी 20 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करताना सर्वपक्षीय आमदारांनी ड्रग्ज विक्रीच्या रॅकेटवर चिंता व्यक्त केली होती. कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज विक्रीच्या रॅकेटमध्ये ‘मकोका’ लावण्यात येईल अशी घोषणाही केली होती. पण तरीही ड्रग्ज विक्रीचे प्रमाण वाढत असल्याचे गृह विभागाकडील आकडेवारीवरून दिसून येत आहे.
ऍण्टी नार्कोटिक्स सेल
अमली पदार्थविरोधात प्रभावी कारवाई करण्यासाठी महाराष्ट्रात अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्याशिवाय राज्यात 45 पोलीस विभागात ऍण्टी नार्कोटिक्स सेल स्थापन केला असून त्यामध्ये 67 पोलीस अधिकारी व 247 पोलीस अंमलदार आहेत.
n मे 2024 आणि मे 2025 अखेरपर्यंतच्या केलेल्या कारवाईची तुलना केल्यास कारवाईत 481 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
तीस दिवसांची विशेष मोहीम
राज्यात या वर्षी 1 ते 30 मे या काळात अमली पदार्थ विक्रीच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यात 4 हजार 926 किलो ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले. फक्त तीस दिवसांत तब्बल 140 कोटी 21 लाख रुपयांचा एकूण ड्रग्ज जप्त झाले. ड्रग्ज विक्रीच्या रॅकेटमध्ये एकूण 1 हजार 651 जणांना अटक करण्यात आली. त्यात तेरा परदेशी नागरिक आहेत.
वर्ष दाखल गुन्हे
2021 10 हजार 668
2022 13 हजार 647
2023 15 हजार 487
2024 15 हजार 873
मे अखेर 8 हजार 218
राज्याच्या गृह विभागाने मार्च 2022 मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या मार्फत अमली पदार्थ तस्करीच्या कारवायांचा आढावा घेतला जातो.



























































