
कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून उमेदवारांची मालमत्ता प्रसिद्ध करण्यात आली आहे. 81 जागांसाठी तब्बल 325 उमेदवार रिंगणात असून, यात 71 उमेदवार अपक्ष आहेत. यांतील 1 ते 10 कोटींपर्यंत संपत्ती असलेले तब्बल 85, तर 20 कोटींहून अधिक संपत्ती असलेले सहा ‘कोटय़धीश’ उमेदवार आहेत. बहुतांशी उमेदवार हे ‘लखपती’ आहेत. प्रभाग क्र. 17-‘ड’मधील काँग्रेसचे उमेदवार माजी नगरसेवक प्रवीण केसरकर हे सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत, तर काँग्रेसचेच प्रभाग क्र. 8 व 9मधील ऋग्वेदा राहुल माने व त्यांचे पती राहुल माने हे दुसऱया व तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी 325 उमेदवारांनी त्यांच्या जंगम व स्थावर मालमत्तांचे शपथपत्र निवडणूक विभागाकडे सादर केले आहे. यामध्ये 85 उमेदवार कोटय़धीश असल्याचे दिसून येत आहेत. काँग्रेसचे प्रभाग क्र. 17-‘ड’मधील उमेदवार माजी नगरसेवक केसरकर यांच्या नावावर एकूण 49.94 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या उमेदवार ऋग्वेदा राहुल माने यांच्या नावावर 35.36 कोटी, त्यांचे पती राहुल माने यांच्या नावावर 34.38 कोटी रुपये मालमत्ता आहे. काँग्रेसचेच प्रभाग क्र. 13मधील उमेदवार प्रवीण हरिदास सोनवणे यांच्या नावावरही 34.30 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. महायुतीचे प्रभाग क्र. 9मधील उमेदवार माधवी मानसिंग पाटील या सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्या नावावर सुमारे 24 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर, याच प्रभागातील शिंदे गटाचे उमेदवार शारंगधर देशमुख यांच्या नावे सुमारे 20 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे दिसून येत आहे.
36 उमेदवारांवर गुन्हा
महापालिका निवडणुकीत 36 उमेदवारांवर गुन्हे नोंद असल्याचे दिसून येते. यांमध्ये 34 उमेदवारांची प्रकरणे न्यायप्रविष्ट असून, त्यांना शिक्षा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या माहितीमधून निदर्शनास येते. तर, दोन उमेदवारांना एक वर्षाहून अधिक कारावासाची शिक्षा झाली आहे. एके काळी गुन्हेगारी वर्तुळात दहशत माजवणारे आणि गंभीर गुह्यांची पार्श्वभूमी असलेले 29 उमेदवार राजकीय भवितव्यासाठी आखाडय़ात उतरल्याने महापालिका निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. हे 29 उमेदवार पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. जुना राजवाडा हद्दीत 10, राजारामपुरी 7, शाहूपुरी 7, लक्ष्मीपुरी पोलीस 4, तर करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका उमेदवाराचा यामध्ये समावेश आहे. संबंधित उमेदवारांसह साथीदारांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.
अनेक उमेदवार दहावीपर्यंत शिकलेले
शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत अनेक उमेदवार दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहेत. काहींचे पदवीचे शिक्षण अर्धवट राहिलेले आहे. तसेच पदवीधर, पदव्युत्तर, पदवी घेतलेले, आयटीआय, डी.एड., बी.एड., बिझनेस मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, आयटी, सिव्हिल इंजिनीअर, एलएलबी, डॉक्टर, ‘पीएच.डी.’धारक असलेलेही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तडीपारीचा प्रस्ताव
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोठेही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी 177 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलीस रेकॉर्डवरील 108 गुंडांना निवडणूक काळासाठी जिह्यातून तडीपार करण्यात येत आहे. 20 गुंडांना एक-दोन वर्षांसाठी कोल्हापूरसह सांगली जिह्यातून तडीपार करण्याचे प्रस्ताव पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱयांकडून पोलीस अधीक्षकांकडे दाखल करण्यात आले आहेत.






























































