10 किलो ड्रग्ज पारनेरमध्ये कुणाच्या घरात होते? डॉ. सुजय विखे-पाटील यांचा सवाल

पुणे जिह्यातील ड्रग्ज रॅकेटच्या संशयावरून पुणे पोलिसांनी अहिल्यानगरमधील स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारी शामसुंदर गुजर यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुजर सध्या अहिल्यानगर एलसीबीत कार्यरत आहे. तो पूर्वी पारनेर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. पारनेरच्या बॉण्ड्रीवरील पुणे जिह्यातील शिरूरमध्ये ड्रग्जचे रॅकेट सापडले. त्याचे धागेदोरे थेट पारनेरपर्यंत पोहोचल्याने पारनेर आणि ड्रग्ज हे समीकरण उघड झाले आहे. त्यामुळे अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाच्या तपासातील सगळे सत्य सांगावे, तसेच ज्यांच्या घरात हे 10 किलो ड्रग्ज होते, ते कुणाचे कार्यकर्ते होते, याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी माजी खासदार, डॉ. सुजय विखे-पाटील यांनी केली आहे.

ड्रग्जसारख्या गंभीर प्रकरणात नगरमधील पोलीस कर्मचाऱयाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पत्रकारांनी डॉ. विखे यांना प्रश्न विचारला. त्यावर डॉ. सुजय विखे म्हणाले, ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलेला पोलीस पूर्वी पारनेर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्यावेळी तेथील अवैध व्यावसायिकांसोबत त्याचे संबंध होते. इतरही अनेक गंभीर प्रकरणात त्याचा सहभाग होता. त्याच्याविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी करून त्याची बदली करण्याची मागणीही झाली होती. वादग्रस्त या पोलिसाची बदली थेट स्थानिक गुन्हे शाखेत झाली. म्हणजेच त्याच्या डोक्यावर कोणत्यातरी नेत्याचा हात होता. एकीकडे एसपी स्थानिक गुन्हे शाखेत इमानदार पोलीस घेतल्याचे सांगतात; मग त्या वादग्रस्त पोलिसाला थेट एलसीबीत कुणाच्या सांगण्यावरून घेतले गेले, हे पोलीस अधीक्षकांनी जाहीर करावे. आत्ताच्या ड्रग्ज प्रकरणात 10 किलो ड्रग्ज हे पारनेरमधील दोघांच्या घरी ठेवले गेले होते; मग ते कुणाच्या घरात होते? त्यांची नावे पोलीस का सांगत नाहीत. ज्यांच्या घरात हे 10 किलो ड्रग्ज होते, ते कुणाचे कार्यकर्ते होते? त्यांची नावं गुह्यात येऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात कोण अर्धा तास बसून होतं, हे सगळं मला माहीत आहे. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन हे सांगावे, अशी मागणी विखे यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांवर कुणाचा दबाव आहे, मी जे प्रश्न उपस्थित करतोय, त्याचीही उत्तरे द्यावीत. अन्यथा, आगामी आठ दिवसांत आपण स्वतः पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील सगळ्यांची नावे उघड करू. गंभीर गुन्हा करणारे कुणाचेही कार्यकर्ते असो, त्यांना कायद्याने शिक्षा व्हायलायच हवी, असेही विखे यांनी स्पष्ट केले.