रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वार सुशोभिकरणाचा उदघाटन सोहळा आचारसंहितेच्या पुर्वी आटोपण्याची घाई सुरु असलेल्या कामाचा सोसाट्याच्या वाऱ्याने बोजवारा उडवला. सोसाट्याच्या वाऱ्याने प्रवेशद्वाराच्या छपरावरील पीओपी शीटस कोसळल्या. घाईगडबडीतल्या कामामुळे सुशोभिकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, मिंधे सरकारच्या राजवटीमध्ये अशी तकलादू कामे आता जनतेसमोर येत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोकण रेल्वेमार्गावरील रेल्वेस्थानकाचे प्रवेशद्वार सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वेस्थानकांच्या सुशोभिकरणाची कामे पूर्ण झाली तरी रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे काम संथगतीने सुरु होते. निवडणूक तोडावर आल्यामुळे आचारसंहितेपुर्वी रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या सुशोभिकरणाच्या कामाचे उदघाटन करून श्रेय लाटण्याची घाई मिंधे सरकारला झाली. त्यामुळे गेल्या काही दिवसात रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या सुशोभिकरणाचे काम घाईगडबडीत सुरु झाले. या घाईगडबडीत सुरु असलेल्या कामाचा पर्दाफाश रविवारी रात्री सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने केला. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि रत्नागिरी रेल्वेस्थानकातील प्रवेशद्वारावरील पीओपी डळमळली. पीओपीच्या शीटस खाली कोसळल्या. शीट कोसळत असल्याचे पाहताच नागरीकांनी बचावासाठी सुरक्षित जागी पळ काढला.
9 ऑक्टोबरला उद्घाटन रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या सुशोभिकरणाचे 9 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता उद्घाटन होणार आहे. उद्द्घाटनापुर्वी काम पूर्ण व्हावे यासाठी ही सर्व घाईगडबड सुरु होती. त्याच घाईगडबडीत सोसाट्याच्या वाऱ्याने पीओपीचे शीटस खाली पडले. मिंधे सरकारच्या राजवटीतील विकासकामे वाऱ्यानेच कोसळत असल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.