पोपटवाल्या ज्योतिषाचा आयकर अधिकाऱ्याला 35 लाखांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरूमध्ये एका ज्योतिषाने आयकर अधिकाऱ्याला 35 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा आयकर अधिकारी कार्यालयात जात असताना त्याला रस्त्यावर पोपट घेऊन भविष्य सांगणारा ज्योतिष दिसला. चेहरा आणि पुंडली पाहून लोकांचे भविष्य सांगण्याच्या नावाखाली या ज्योतिषाने आयकर अधिकाऱ्याचे 35 लाखांचे सोने-चांदीचे दागिने घेऊन पलायन केले. कार्यालयातून बदली करायची आहे. त्यामुळे काय करावे लागेल, असे आयकर अधिकाऱ्याने ज्योतिषाला विचारले. त्यावर ज्योतिषाने सांगितले की, सर्वात आधी छोटी पूजा घालावी लागेल त्यासाठी ज्योतिषाने 50 हजार रुपये घेतले. लवकर बदली होईल का? असे आयकर विभागातील अधिकाऱ्याने ज्योतिषाला विचारले असता यासाठी मोठी पूजा घालावी लागेल. त्यामुळे घरातील सर्व सोने आणि चांदीचे दागिने घेऊन यावे लागेल, असे सांगितले. ज्योतिष्यावर विश्वास ठेवून या अधिकाऱ्याने 194 ग्रॅम सोने आणि 1 किलो चांदीचे दागिने ज्योतिषाकडे दिले. एका दिवसात पूजा करून दागिने परत करतो, असे सांगितले. परंतु आठवडा उलटला तरी दागिने परत न केल्याने अधिकाऱ्याला संशय आला. अधिकाऱ्याने रोजच्या बसणाऱ्या ठिकाणी जाऊन पाहिले तर ज्योतिष आणि त्याचा पोपट दोघेही गायब झाले होते. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आयकर अधिकाऱ्याने या ज्योतिषाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.