
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यात निवडणूक विभागाच्या निष्काळजीपणामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. त्रुटीपूर्ण नामनिर्देशन अर्जांचे वाटप केल्याने दीडशे इच्छुक उमेदवारांना फोन करून परत बोलावण्याची नामुष्की प्रशासनावर आली. निवडणूक यंत्रणेचा निष्काळजीपणा उघड झाला असून, यामध्ये इच्छुकांची फरफट झाली आहे. मात्र, ही चूक झेरॉक्स करणाऱ्यामुळे झाल्याचे सांगत तहसीलदारांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
शुक्रवार व शनिवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुकांनी तालुका निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज नेले. नामनिर्देशनपत्र 16 नमुन्यांमध्ये देणे बंधनकारक असताना, निवडणूक विभागाने तेरा नमुन्यांमध्ये अर्ज उपलब्ध करून दिले. त्यातही अकरा, बारा व तेरा हे नमुने दुबार पाने असल्याने संपूर्ण बंचच चुकीचा तयार करून इच्छुकांना दिला. सुमारे 147 अर्जांचे वाटप झाल्यानंतर ही चूक तिरवडेच्या दिलीप गुरव यांनी निवडणूक विभागाच्या निदर्शनास आणून दिली. नंतर प्रशासनाचे डोळे उघडले. दोन दिवसांत अर्ज घेतलेल्या इच्छुकांना फोन करून कार्यालयात बोलावले आणि नवीन अर्ज देण्यात आले. याबाबत तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रकरणाला दुजोरा दिला. मात्र, ही चूक झेरॉक्स करणाऱ्यामुळे झाल्याचे सांगत त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
























































