
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या कानाकोपऱयात धावणाऱया एसटी महामंडळाच्या बसगाडय़ांमध्ये ऑनलाईन तिकिटाला पसंती वाढली आहे. बससेवेमध्ये डिजिटल व्यवहारांना मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. दररोज लाखो प्रवासी गुगल पे, फोन पे व तत्सम यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत डिजिटल तिकीट काढण्याला प्रवाशांनी अधिक पसंती दिली आहे. सप्टेंबर 2025 महिन्यात एकूण सुमारे 49.79 लाखांहून अधिक यूपीआयद्वारे तिकीट व्यवहार झाले. त्यातून एसटी महामंडळाला 64 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. ऑक्टोबर महिन्यात ही संख्या आणखी वाढून 77.32 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. तसेच नोव्हेंबरमध्ये यूपीआय व्यवहारांमधून सुमारे 78.66 कोटी रुपयांचा महसूल एसटी महामंडळाला मिळाला आहे. डिसेंबरमध्ये 62.59 लाखांहून अधिक प्रवाशांनी यूपीआयद्वारे तिकीट काढले. त्यातून 83.67 कोटी रुपये महसूल जमा झाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.
सुट्या पैशांची कटकट संपली!
पूर्वी एसटीच्या गाडय़ांमध्ये सुट्य़ा पैशांवरून वाद होण्याचे प्रकार घडलेले आहेत. ऑनलाईन तिकीट प्रणाली उपलब्ध झाल्यानंतर एसटी गाडय़ांमधील वाद थांबले आहेत. महामंडळाने बसस्थानक, तिकीट खिडक्या तसेच प्रवासात कंडक्टरमार्फत यूपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध केल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत आहे. तसेच सुटय़ा पैशांची कटकट संपली असून काही वाहकांकडून होणारा पैशाचा अपहार रोखण्यासाठी डिजिटल पेमेंट प्रक्रियेची मदत झाली आहे.






























































