
पहिल्या दोन कसोटीत तीन शतकांचा धमाका करत 146 धावांच्या सरासरींनी 585 धावा फटकावणाऱया शुभमन गिलला सर डॉन ब्रॅडमन यांच्या कसोटी मालिकेतील 974 धावांच्या विश्वविक्रमाला मागे टाकण्याची संधी आहे. गिलला अजून तीन कसोटी सामने खेळायचे आहेत आणि या सामन्यात 389 धावा करून ब्रॅडमन यांचा विक्रम मोडणे शक्य होऊ शकेल. कसोटी इतिहासात ब्रॅडमन यांच्या सरासरीप्रमाणे त्यांच्या मालिकेतील एकूण धावांचा विक्रमही गेले 95 वर्षे अबाधित आहे.
गिलने गेल्या दोन कसोटींतील चार डावांत 147, 8, 269 आणि 161 अशा जबरदस्त खेळी केल्या आहेत. त्याचा हा फॉर्म कायम राहिला तर त्याच्यासाठी ब्रॅडमन यांना मागे टाकणेही कठीण नसेल. कसोटीच्या 148 वर्षांच्या इतिहासात एका कसोटी मालिकेत असंख्य फलंदाजांनी 600 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. मात्र 35 खेळाडूंनी 700 पेक्षा अधिक तर केवळ 9 फलंदाजांनी 800 पेक्षा अधिक धावा ठोकल्या आहेत. तसेच ब्रॅडमन (974) आणि वॉली हॅमंड (905) या दोन दिग्गजांनीच कसोटी मालिकेत 900 पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. हे सर्व विक्रम गिलच्या आवाक्यात असले तरी पुढील तीन कसोटींत तो आपल्या शतकांचे सातत्य किती राखतोय यावरच सर्व अवलंबून असेल.
या विक्रमांच्या आधी त्याला सुनील गावसकरांच्या 774 धावांनाही मागे टाकण्याची सुवर्ण संधी आहे. विशेष म्हणजे गावसकरांनी 1970-71 साली आपल्या पहिल्याच मालिकेत 65, ना. 67, 116, ना. 64, 1. ना. 117, 124 आणि 220 अशा खेळय़ा करत विंडीजविरुद्ध 774 धावांचा भीमपराक्रम केला होता.
आता थांबायचं नाय… लॉर्ड्सवरही तिरंगा फडकवण्यासाठी गिल सेना सज्ज