
हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० साखळीतील दुसरा सामना शुक्रवारी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये ८४ धावांची धडाकेबाज खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. आता दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये दोन महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.
तिलक वर्माच्या दुखापतीनंतर आणि आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता श्रेयस अय्यरचे दीर्घ काळानंतर टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. रायपूर येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात ईशान किशनच्या जागी श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता आहे. टीम इंडियाची मधली फळी सध्या दमदार खेळी करत आहे. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर हार्दिक पंड्या आणि रिंकू सिंग फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
रायपूरचे मैदान फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल मानले जाते. त्यामुळे शिवम दुबेच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते.जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवतील.
टीम इंडियाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन संघ
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन/श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 साखळी सामन्यांसाठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (पहिले तीन टी-20), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, ईशान किशन (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई.


























































