IND Vs WI – राहुल-जुरेलची धडाकेबाज फलंदाजी, जडेजाने धोनीला मागे टाकलं; दुसऱ्या दिवसावरही हिंदुस्थनाची मजबूत पकड

पहिल्या कसोटी सामन्यावर टीम इंडियाने मजबूत पकड निर्माण केली आहे. दुसऱ्या दिवशी केएल राहुल (100), ध्रुव जुरेल (125), शुभमन गिल (50) आणि रविंद्र जडेजा (104*) यांनी धडाकेबाज फलंदाजीमुळे टीम इंडियाला दुसरा दिवस संपेपर्यंत पाच गड्यांच्या मोबदल्यात 448 धावांपर्यंत मजल मारत 286 धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरी करत महेंद्र सिंग धोनीला मागे टाकलं आहे.

वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 162 धावांवर सर्वबाद केल्यानंतर टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात आतापर्यंत जबरदस्त फलंदाजी केली आहे. दिवसाअखेर 5 गड्यांच्या मोबदल्यात 448 धावा करत 286 धावांची आघाडी संघाने घेतली आहे. सध्या रविंद्र जडेजाने नाबाद 176 चेंडूंचा सामना करत 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या हिंदुस्थानी खेळाडूंच्या यादीमध्ये महेंद्र सिंग धोनीला पिछाडीवर टाकलं आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीचा 79 वा षटकार खेचला आणि महेंद्र सिंग धोनीला (78 षटकार) मागे टाकलं. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या हिंदुस्थानी खेळाडूंच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर ऋषभ पंत (82 षटकार) विराजमान आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग (90 षटकार), तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा (88 षटकार), चौथ्या क्रमांकावर रविंद्र जडेजा (79 षटकार) आणि पाचव्या क्रमांकावर महेंद्र सिंग धोनी (78 षटकार) आहे.