‘संचार समिट 2026’ मध्ये स्वतंत्र वेबसाईट लाँच, एका क्लिकवर मराठी तरुणांना रोजगार! शिव संचार सेनेचे टेलिकॉम, दळणवळण क्षेत्रात नोकरीसाठी विनामूल्य व्यासपीठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या शिव संचार सेनेच्या वतीने आयोजित ‘संचार समिट 2026’ आज पार पडले. यावेळी टेलिकॉम, फिनटेक आणि डिजिटल कॉमर्स क्षेत्रातील धुरिणांचा सुसंवाद घडवण्यात आला. तसेच शिव संचार सेनेच्या वतीने एका वेबसाईटचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेबसाईटवर बेरोजगार तरुणांना दळणवळण क्षेत्रात रोजगाराची संधी एका क्लिकवर विनामूल्य उपलब्ध होणार आहे.

विलेपार्ले पूर्व येथील डोमेस्टिक विमानतळासमोरील सहारा स्टार हॉटेलमधील वेस्ट ब्लॉक हॉलमध्ये या संचार समिटचे आयोजन करण्यात आले होते. त्यात टेलिकॉम, फिनटेक आणि डिजिटल कॉमर्स क्षेत्रातील तज्ञांच्या उपस्थितीत बदलत्या जगाबरोबरच या क्षेत्रांमध्ये होणारे बदल, अद्ययावतीकरण, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी आदींबाबत विचारमंथन झाले.

शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनीही यावेळी टेलिकॉम व दळणवळण क्षेत्राबाबत अमूल्य मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपनेते आमदार सचिन अहिर, शिव संचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे आदी उपस्थित होते. आज सुरू करण्यात आलेल्या वेबसाईटवर रोजगारासाठी नोंदणी करणारे तरुण थेट दळणवळण कंपन्यांशी जोडले जातील, असे चित्रे यावेळी म्हणाले.

दळणवळण क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी सुसंवाद वाढवा आदित्य ठाकरे यांचे आवाहन

टेलिकॉम आणि दळणवळण क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या असतील तर सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागेल. परस्पर संवाद वाढवावा लागेल, असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले. लोकांमध्ये, विविध धर्मांमध्ये, देशांमध्ये सुसंवाद झाला असता तर जगात वाद निर्माण झालेच नसते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आपण आपल्या मातृभाषेचा सन्मान ठेवलाच पाहिजे आणि कारभारातही तिचा वापर झाला पाहिजे, पण त्याबरोबरच जगाशी संवाद साधण्यासाठी जगाची भाषासुद्धा आपण शिकली पाहिजे, असे ते पुढे म्हणाले. पुढील पाच वर्षांत तरुणांसमोर येणारी प्रमुख अडचण म्हणजे जॉब, जॉब आणि जॉब ही असेल. त्यामुळे मराठी तरुण-तरुणींना रोजगार देणे गरजेचे आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत (एआय) बोलताना आदित्य ठाकरे यांनी, एआयबाबत तरुण पिढीमधील भीती दूर करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे, असे मत आदित्य ठाकरे यांनी मांडले.