तमीम ‘हिंदुस्थानचा एजंट’ असल्याचा आरोप, बीसीबी संचालकांच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

बांगलादेशचा माजी राष्ट्रीय कर्णधार तमीम इक्बालवर ‘हिंदुस्थानचा एजंट’ असल्याचा आरोप केल्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) फायनान्स कमिटीचे अध्यक्ष नजमुल इस्लाम गंभीर वादात अडकले आहेत. आगामी आयसीसी टी-20 विश्वचषकातील बांगलादेशच्या सहभागाबाबत मत मांडताना ‘क्रिकेटला सर्वात वरचे प्राधान्य द्यावे’ असे तमीम यांनी सांगितले होते. याच विधानावर संतप्त होत नजमुल यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली.

बीसीबीने सुरक्षेची कारणे देत हिंदुस्थान दौऱयावर न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि आयपीएलपूर्वी बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सकडून मुस्तफिजुर रहमानला मुक्त करण्यास सांगितल्यानंतर हा वाद पेटला. नजमुल यांच्या फेसबुक पोस्टमध्ये ‘बांगलादेशच्या जनतेने आणखी एका पक्क्या हिंदुस्थानी एजंटचा उदय पाहिला’ असे लिहिण्यात आले असून त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या वक्तव्यावर बांगलादेश क्रिकेटर्स वेल्फेअर असोसिएशन आक्रमक झाली आहे. संघटनेने बीसीबी अध्यक्षांकडे तक्रार करत सार्वजनिक माफी व कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘16 वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करणाऱया सर्वात यशस्वी सलामीवीराविषयी अशी भाषा निंदनीय असून संपूर्ण क्रिकेट समुदायाचा अपमान आहे,’ असा घणाघात खेळाडूंच्या संघटनेने केला.