सभापती धनखड संघाचे एकलव्य, संसद नव्हे सर्कस चालवतात; लोकशाही वाचविण्यासाठी इंडिया आघाडीने दाखल केला अविश्वास प्रस्ताव

राज्यसभा सभापती जगदीप धनखड हे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडे विरोधक म्हणून पाहतात. सदस्यांना अपमानित करतात. हेडमास्तरांप्रमाणे ते शाळा घेतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकलव्य असल्याचे धनखड यांनी स्वतःच सांगितले आहे. धनखड हे संसद नव्हे तर सर्कस चालवतात असे गंभीर आरोप आज इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केले. देशाचे संविधान, लोकशाही वाचविण्यासाठी धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याचेही या नेत्यांनी सांगितले.

इंडिया आघाडीने राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात मंगळवारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावरून आज राज्यसभेत गदारोळ झाला. सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले. अविश्वास प्रस्तावाबाबत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका मांडली आणि धनखड यांच्या कारभारावर गंभीर आक्षेप घेतले. पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, आपचे नेते संजयसिंह, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान यांच्यासह तृणमुल काँग्रेस, द्रमुक, सपा आदी इंडिया आघाडीचे नेते उपस्थितीत होते.

सरकारचे प्रवक्ते म्हणून धनखड काम करतात

सभापती धनखड हे प्रमोशनसाठी सरकारचे प्रवक्ते म्हणून काम करतात. कधी ते सरकारचे काwतुक करतात तर कधी स्वतः संघाचे एकलव्य असल्याचे सांगतात. धनखड यांचे आचरण पदाला शोभणारे नाही असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. विरोधकांनी प्रश्न उपस्थितीत केले तर धनखड हेच सरकारची ढाल बनून उभे राहतात. राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय येत असेल तर त्यामागचे कारण सभापती धनखड हेच आहेत. सभापतीच जर सरकारचे गुणगाण गात असतील तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कुणाकडे पाहायचे? असा सवाल खरगे यांनी उपस्थितीत केला. आमचे धनखड यांच्याशी कोणतेही वैर नाही. पण त्यांच्या वागण्यामुळेच देशाच्या संसदीय इतिहासात पहिल्यांदा राज्यसभा सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणावा लागला.

अशा प्रकारे सभागृह चालवले गेले तर लोकशाही राहणार नाही

गेल्या 22 वर्षांपासून मी सभागृहात आहे. मी आतापर्यंत राज्यसभेत भैरवसिंह शेखावत, व्यंकय्या नायडू, दोनवेळा हमीद अन्सारी असे सभापती पाहिले. पण आता जी परिस्थिती आहे ती याआधी कधीही पाहिली नाही. इतकी भयंकर परिस्थिती असूनही सभापती मजा घेत आहेत. ते सभागृह नाही, सर्कस चालवत आहेत, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. सभागृह सुरू होताच सभापती धनखड हेच स्वतः 40 मिनिटे भाषण करतात. संपूर्ण वेळ तेच घेतात. नंतर जो शिल्लक वेळ असतो ते समोरच्यांना दंगामस्ती करायला सांगतात. अविश्वास प्रस्ताव आणण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. हा लढा व्यक्तीगत नसून राज्यसभा वाचविण्यासाठी आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.